उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द


राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर, फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी उद्या (दि. २ एप्रिल) आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १ एप्रिल : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांचा उद्या, दि. २ एप्रिल रोजी वाढदिवस असतो. मात्र, राज्याचे लाडके नेते तथा उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या अकाली झालेल्या निधनामुळे, आमदार सचिन पाटील हे यंदा आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण शहराध्यक्ष तथा नगरसेवक राहुल निंबाळकर यांनी दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठी शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर साधेपणा आणि सामाजिक भान जपत आमदार सचिन पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच, आमदार सचिन पाटील हे सध्या त्यांच्या काही वैयक्तिक आणि कौटुंबिक कामकाजाच्या निमित्ताने बाहेरगावी आहेत, अशी माहितीही शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी यावेळी दिली आहे.

त्यामुळे कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!