
दैनिक स्थैर्य | दि. 24 फेब्रुवारी 2025 | फलटण | विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी गेल्या काही दिवसांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कंबर कसली असून श्रीमंत रामराजे हे फलटण शहरासह तालुक्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत कार्यकत्यांना चार्ज करीत आहेत. यामध्ये गट सोडून करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तातडीने गट सोडावा; असे मत व्यक्त करीत असताना “माझे गुडघे जरी काम करत नसले तरी माझं डोकं चांगलं काम करतंय; त्यांना खुर्चीत बसून संपविन” असा सज्जड दम श्रीमंत रामराजे यांनी विरोधकांना दिला आहे.
आंदरुड येथे शंभूराज विनायकराव पाटील यांनी आयोजित केलेल्या हुरडा पार्टीमध्ये बोलत असताना श्रीमंत रामराजे म्हणाले आहेत की “आयकर विभागाने माझ्यावर धाड टाकायला हवी होती; धाड टाकली की स्टेटस वाढते” असे मत व्यक्त केले आहे. गतकाही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वर आयकर विभागाची धाड पडलेली होती. त्यामधून काही निष्पन्न न झाल्याची माहिती श्रीमंत संजीवराजे यांनी दिलेली होती. याला अनुसरून श्रीमंत रामराजे बोलत होते.
यासोबतच तरडगाव येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या राजे गटाच्या माध्यमातून संपूर्ण ताकतीने लढवणार असून कार्यकर्त्यांनी त्याच्या तयारीला लागावे; असे निर्देश सुद्धा विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत.
आगामी काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदांच्या निवडणुका संपन्न होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे हे सक्रिय प्रचारामध्ये दिसत नव्हते. परंतु आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या श्रीमंत रामराजे स्वतः बाहेर पडत कार्यकर्त्यांसाठी सक्रिय प्रचार यंत्रणेमध्ये राहणार असल्याच्या चर्चा सुद्धा फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्या आहेत.