दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२२ । फलटण । आता देशामध्ये व राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. जे कायम सत्तेमध्ये राहत आलेले आहेत. त्यांनी सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीत येण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना पक्षात प्रवेश मिळाला नाही. आता सभापती पद सुद्धा गेलेले आहे, राहिल्या आहेत त्या फक्त पोलीस गाड्या आता त्या सुद्धा पोलीस गाड्या लवकरच निघतील असे मत व्यक्त करीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना टोला लगावला.
फलटण येथे भारतीय जनता पार्टीच्या संवाद यात्रेच्या सांगता सभेत आमदार गोरे बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा, तालुका व शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण तालुक्यासाठी महाराजांनी काय काय केलंय हे काय मला माहित नाही. विकासाचा व त्यांचा काहीही संबंध नाही. पंधरा वर्ष मंत्रीपद व पालकमंत्री व त्यानंतर सर्वोच्च सभागृहाचे सभापतीपद होत तरी फलटण तालुक्यातील पायाभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे. फलटण तालुक्यात विशेतः तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये फक्त आडवा आडवीचे काम सुरू आहे. चौदा वर्ष त्या खात्याचे मंत्री असताना सुद्धा निरा – देवधरचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. बारामतीचं पाणी बंद केलं म्हणून फलटणच्या नेत्यांना त्रास झाला. तालुक्यात नवीन एमआयडीसी होवू नये म्हणून तालुक्याचे पुढारी बैठका घेत होते, हे किती मोठं दुर्भाग्य आहे, असेही आमदार गोरे यांनी स्पष्ट केले.
या पुढार्यांनी स्वतःची असलेली मालोजीराजे बॅंक एका पतसंस्थेला चालवायला दिली. बँक पतसंस्थेला चालवायला दिली हे राज्यातील एकमेव उदाहरण असेल. फलटण शहरामध्ये असणाऱ्या भुयारी गटार योजना प्रास्तावित खर्चा पेक्षा ३२% जादाच्या दराने दिली. तालुक्याने आता एकदा कधीतरी भाकरी फिरवली पाहिजे. तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, बाजार समिती व विधानपरिषदेत सुध्दा यांच्याच घरातील जर उमेदवार आहेत. जर यांच्या पैकी कुणाला एसीचा दाखला मिळाला असता तर विधानसभेत हेच दिसले असते, असेही यावेळी आमदार गोरे यांनी स्पष्ट केले.
पवारांची बेनामी संपत्ती जप्त केल्यास संपूर्ण राज्य कर्जमुक्त
राज्यामध्ये पवार म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. काँग्रेसमध्ये व राष्ट्रवादीमध्ये जशी घराणेशाही आहे तशी भाजपात नाही. भाजपात सर्वसामान्यांना संधी मिळते. आता जी लढाई आहे ती प्रस्थापितांच्या विरोधात लढाई आहे. राज्यामध्ये सगळ आम्हालाच पाहिजे, असे काही पक्ष वागत असतात. राज्यासह देशातील जर पवारांची बेनामी संपत्ती जप्त केल्यास संपूर्ण राज्य कर्जमुक्त होईल. आगामी काळामध्ये जर भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर याद राखा. येणाऱ्या आगामी काळामध्ये उधारी व्याजासहित आपण परत करणार आहोत. गोरगरिबांना उध्वस्त करण्याचे काम ह्या सत्ताधारी मंडळींनी केले आहे, असेही यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.