दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून तालुक्यातील ग्रामीण भागात आमदार दीपक चव्हाण यांचा झंझावाती प्रचार सुरु असून गाव भेट दौर्यामध्ये ते दररोज हजारो मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातून राजे गटाकडून आमदार दीपक चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून ते महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढत आहेत. यंदाच्या निवडणूकीचे मोठे वैशिष्ठ्य म्हणजे राजे गटाचे प्रमुख नेतृत्त्व असलेले आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे प्रत्यक्ष प्रचार यंत्रणेत उतरलेले नसून त्यांनी प्रचाराची सर्व धुरा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवली आहे. त्यानुसार श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्याचा ग्रामीण भाग पिंजून काढला असून मतदारांशी प्रत्यक्ष भेटीवर त्यांनी जोर दिला आहे.
श्रीमंत विश्वजीतराजे यांच्या गाव भेट दौर्याला पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थांकडूनही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘‘ही निवडणूक आपल्या स्वाभिमानाची असून समोरच्या विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याची ही योग्य संधी तुमच्याकडे आहे. तुमच्या अडीअडचणीत कोण उभे राहते, आपल्या रक्ताचे पाणी करुन तालुक्याच्या विकासासाठी कोण अहोरात्र कष्ट घेत आहे, श्रीमंत रामराजे यांनी तालुक्याचा दुष्काळ कशा पद्धतीने हटवला आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेवून त्यांनी दिलेल्या सुशिक्षीत, स्वच्छ चारित्र्याच्या दीपक चव्हाण यांना आपल्याला सलग चौथ्यांदा विधानसभेत पाठवायचे आहे. त्यासाठी त्यांना भरघोस मतांनी विजयी करा’’, असे आवाहन श्रीमंत विश्वजीतराजे फलटण तालुक्यातील गावोगावच्या मतदारांना करताना दिसत आहेत.