
दैनिक स्थैर्य | दि. 18 ऑगस्ट 2024 | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे गत तीन टर्मचे आमदार दीपक चव्हाण हे एका कुटुंबाचे रबर स्टॅम्प आहेत. खरंतर त्यांच्याविषयी जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही; वास्तविक त्यांना स्वतःच्या पदाची समाजासाठी किंवा मतदारसंघासाठी वापर सुद्धा राजे कुटुंबीय करू देत नाहीत. राजे गटाचे किंबहुना राजे कुटुंबीयांचे ते रबर स्टॅम्प म्हणून काम करत असतात; असे मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
कोळकी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजे गटातील 90% हुन अधिक नेते व कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत. राजे गटामध्ये प्रचंड असवस्था निर्माण झाली आहे. माणिकराव सोनवलकर यांच्या प्रवेशाने आता भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा ओघ सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितल्यानुसार माणिकराव सोनवलकर यांचा योग्य तो सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये ठेवण्यात येणार आहे; असे ही यावेळी माजी खासदार रणजितसिंह यांनी स्पष्ट केले.