सातारा जिल्ह्याच्या वाढत्या कोरोना बाधितांची संख्याच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा, प्रशासनाला दिल्या सूचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १२: जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची व व्हेंटेलेटरची संख्या वाढवा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाचा आढावा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता रेमडेसिवीर औषधांचा अधिकचा पुरवठा जिल्ह्यासाठी व्हावा यासाठी शासनाला पत्र द्या, अशा सूचना करुन गृह राज्यमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, सध्या जिलह्यात 3 हजार ऑक्सीजन बेड व 200 व्हेंटेलेटर आहेत. भविष्याचा विचार करुन ऑक्सिजन बेड व व्हेंटेलेटरची संख्या वाढवली पाहिजे.

शासनाने लॉकडाऊन किंवा आणखीन कडक निर्बंध जाहीर केले तर त्यांच्या अंमलबजावणीसाठी गृह विभागाने मनुष्यबळ तयार ठेवावे. तसेच नागरिकांनी मास्कचा, वेळोवेळी सॅनिटायझरचा, सुरक्षित अंतर याचे पालन केले पाहिजे याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, असे आवाहनही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शेवटी केले.


Back to top button
Don`t copy text!