अशोक खांबेकर यांच्या निधनाबद्दल मंत्री अशोक चव्हाण यांना शोक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, अहमदनगर, दि. २५ : अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त अशोक भिमाशंकर खांबेकर यांच्या निधनाबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे. खांबेकर यांच्या निधनामुळे चव्हाण कुटुंबियांची वैयक्तिक हानी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात चव्हाण म्हणतात, माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून अशोक खांबेकर यांच्याशी चव्हाण कुटुंबियांचे संबंध होते. खांबेकर यांच्या वडिलांची काँग्रेस विचारधारेवर निष्ठा होती व तोच वारसा अशोक खांबेकर यांनी संपूर्ण हयातीत जपला होता. पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था पीटीआयमध्ये काम करत असताना ग्रामीण भागातील समस्यांवर तसेच सर्वसामान्यांच्या ज्वलंत विषयांना त्यांनी वाचा फोडली होती.

पत्रकारितेतील त्यांचे योगदान मोलाचे होते. श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी असतानाही त्यांनी अनेक चांगल्या व भाविकांच्या हिताच्या गोष्टी केल्या. त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा होता. अशोक खांबेकर यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारिता, सामाजिक व राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे सांगून श्री.चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.


Back to top button
Don`t copy text!