दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२१ | सातारा | राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिनी बस आरटीओच्या भरारी पथकाने कारवाई करून कागदपत्रे नसल्याने जप्त केली होती, मात्र रात्रीच्या अंधारात सदर बस विनापरवाना परस्पर घेऊन जाणाऱ्या कोल्हापूर येथील विश्वास माणिकराव कोष्टी यांच्यावर शहर पोलिसात मोटार वाहन निरिक्षक प्रकाश खटावकर यांनी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि.२५ आँक्टोंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीर प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मिनीबस (एम एच २३ वाय ६१७१) शेंद्रे परिसरात आरटीओ कार्यालयाच्या भरारी पथकाला सापडली. अधिक तपासणी करताना संबंधित वाहनांची कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले. त्यावर दंडात्मक कारवाई करून ते वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते.
या वाहनाचा चालक विश्वास माणिक कोष्टी (साईप्रसाद हौसिंग सोसायटी,कोल्हापूर) याने सदर वाहनाला ठोकण्यात आलेला दंड आणि कर न भरता विनापरवानगी कार्यालयाच्या आवारातून पळवून नेली, हे मोटार वाहन निरिक्षक प्रकाश खटावकर यांच्या निदर्शनास आले. तत्काळ वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन चालक विश्वास माणिक कोष्टी यांच्या विरुध्दात शहर पोलिसात गुन्हा नोंदवला आहे.