दूध व बर्फ लादी पुरवठादारांची ३.६८ कोटींची फसवणूक; ममता डेअरीच्या संचालकांविरोधात गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑगस्ट २०२६ | सातारा |
दूध व बर्फ लादी पुरवठादारांची तब्बल ३ कोटी ६८ लाख ५२ हजार ८५९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बोरगाव, ता. सातारा येथील ‘ममता मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट’ या डेअरीच्या संचालकांविरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिन सोपान साळुंखे, संजय बाळकृष्ण साळुंखे आणि मारुती जाधव यांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत दूध व्यावसायिक समीर विलास विभुते (४६, रा. सासवडे, ता. सातारा) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सचिन सोपानराव साळुंखे, दीपक सोपानराव साळुंखे, संजय बाळकृष्ण साळुंखे (सर्व रा. बोरगाव, ता. सातारा), तसेच स्वाती मारुती जाधव, प्रतिभा प्रताप जाधव, मारुती रघुनाथ जाधव आणि प्रताप रघुनाथ जाधव (सर्व रा. इंदोली, ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून ममता डेअरीच्या संचालकांनी १७ दूध व बर्फ लादी पुरवठादारांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून वेळोवेळी दूध व बर्फ लाद्यांचा पुरवठा करून घेतला. मात्र, पुरवठा केलेल्या मालाची एकूण ३ कोटी ६८ लाख ५२ हजार ८५९ रुपयांची बिले अदा केली नाहीत. पुरवठादारांनी थकीत रकमेची मागणी केली असता संचालकांनी पैसे देण्यास नकार देत ‘पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा,’ असे सांगत धमकी दिल्याचा तसेच कोर्टामार्फत नोटीस पाठवतो, तेव्हा कळेल आम्ही कोण आहोत,’ असे म्हणत धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Back to top button
Don`t copy text!