स्थैर्य, आरोग्य विशेष : सध्याच्या युगात मेडिकल शास्त्र प्रगत झाले असल्यामुळे मनुष्याचे आयुर्मान जरूर वाढले आहे पण निरोगी आयुष्य किती वृद्ध लोकांना मिळते आहे ही एक विचार करण्याची गोष्ट आहे.
साधारण 80 वयापर्यंत मनुष्याचे आयुर्मान निश्चित धरले गेले आहे. 60 वया पर्यंत सहसा आरोग्याच्या तक्रारी भेडसावत नाहीत. पण त्यानंतर मग वृद्ध काही व्याधींनी ग्रासलेले दिसतात.
अलझायमर्स, मेंदू आकुंचन पावणे, पार्किंसोनिझम, हाडे ठिसूळ पणा, लकवा मारणे, खुब्यातील हाडे मोडणे आणि डिप्रेशन अशा अनेक व्याधींनी बरेच वृद्ध ग्रासलेले दिसतात. दीर्घायुष्य तर मिळते पण निरोगी आयुष्य मिळेल याची काही गॅरंटी नाही.
हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे नुकतीच मला माझ्या मोठ्या काकांची (की ज्यांचे वय सध्या 92 आहे ) त्यांची सेवा करण्याचा योग आला किंबहुना तो भगवंतांनी आणला असे मी म्हणीन. ते मध्यप्रदेश येथील सागर युनिव्हर्सिटी मध्ये योगाचे विभाग प्रमुख होते. त्यांनी ओशो रजनीश यांच्या बरोबरपण काम केले आहे. रोज योग केल्यामुळे त्यांचे आयुष्य उत्तम निरोगी आणि सुदृढ गेले. पण गेले काही दिवस त्यांना अलझायमर्स आणि डिमेंशियाचा त्रास होऊ लागला आहे. अशा वेळी खरच दीर्घायुष्य चांगले की वाईट हा प्रश्न पडतो.
तपस ही एक अशी संस्था आहे की जी अशा सर्व वृद्धांसाठी सौ. प्राजक्ता वडगावकर यांनी पुणे येथे सुरू केली आहे. त्या प्रसिद्ध डॉ. अनिल अवचट यांच्या नातेवाईक आहेत. परवाच त्यांना भेटण्याचा योग आला. तिथे सध्या 45 वृद्ध राहत आहेत की ज्यांना वर सांगितल्याप्रमाणे आजार आहेत आणि त्यांचे वय 51 वया पासून 102 असे आहे. हे सर्व वृद्ध एका कुटुंबा प्रमाणे राहतात आणि त्यांना लहान मुलांसारखे जपले जाते. त्यांची सर्व बाजूनी उत्तम काळजी घेतली जाते.
खरंय जसा जसा माणूस वृद्ध होईल तसा तो मनानी लहान मुलांसारखा वागायला लागतो आणि म्हणूनच की काय नातवांचे आणि आजी-आजोबांचे अगदी व्यवस्थीत जमते .
म्हातारपण म्हंटले तर सुखावह असते पण कधीकधी ते त्रासदायक पण होऊ शकते. पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धती मध्ये वयानी मोठी माणसे घरात असणे हा एक मोठा आधार असायचा आणि वेळोवेळी त्यांचे सल्ले घेतले जायचे. त्यांचा आदर केला जायचा आणि त्यांची योग्य काळजी पण घेतली जायची.
पण जशी एकटी कुटुंब पद्धती आली तशी वृद्ध माणसे घरातील एक अडगळ होऊन बसली आणि ती नकोशी होऊ लागली. ’वृद्धाश्रम’ या मुळेच निघाली असावीत आणि ओसंडून वाहाताहेत. फलटण कुरवली येथील वृद्धाश्रमात सध्या 18वृद्ध रहात आहेत .
घरातील वृद्धांची काळजी घेणे हे प्रत्येक मुलाचे किंवा मुलीचे कर्तव्य आहे असे मी समजतो. आपल्याला जन्म दिल्याचे ऋण फेडण्याचा तो अति-उत्तम मार्ग आहे. त्यांना फक्त तुमच्या मायेचा ओलावा आणि थोडेसे प्रेम एवढेच अपेक्षित असते. जी मुले आपल्या आई-वडिलांची काळजी घेत नाहीत त्यांना त्यांच्या म्हातारपणी हेच भोगावे लागते यात काही शंकाच नाही. (जसे पेराल तसे उगवेल).
वृद्ध होणे ही सहज गोष्ट आहे पण ती निस्तरणे ही अवघड गोष्ट आहे. प्रत्येकालाच कधीना कधीतरी वृद्ध व्हायचे आहे, पण हा वृद्धापकाळ सुखाचा, निरोगी आणि आनंदी जावो हीच सर्वांची मनापासून इच्छा असते. प्रत्येकालाच असे वाटते की आपल्याला वृद्धापकाळात चालते बोलते असतानाच पटकन मरण यावे पण तसे सगळ्यांच्याच बाबतीत होतेच असे नाही.
तर मित्रहो जाताजाता,
’म्हातारपण देगा देवा, पण ते सुखाचे असुदे,
पिकले पान कधी गळून पडेल माहित नाही, हे मनी वसुदे,
श्रद्धा आणि सबुरी ठेवली म्हणजे आयुष्य सुकर होईल,
येईल त्या परिस्थितीला सामोरे जाऊन आनंदाने जगणे हाच आपला हट्ट राहील !!’
जय श्रीराम !
डॉ.प्रसाद जोशी,
अस्थीरोगशल्य चिकित्सक,
जोशी हॉस्पिटल प्रा.लि;
फलटण.