
साताऱ्याहून पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारला धुळदेव (ता. माण) हद्दीत अपघात होऊन दोन जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. रखडलेल्या रस्ता कामामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
स्थैर्य, म्हसवड, दि. २ एप्रिल : सातारा येथून पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारला माण तालुक्यातील म्हसवडनजीक धुळदेव गावच्या हद्दीत गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना साताऱ्यातील डॉ. क्रांतिसिंह रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
उखडलेल्या रस्त्यामुळे कारने खाल्ल्या पलट्या
सातारा (कोडोली) येथील निकम कुटुंब देवदर्शनासाठी आपल्या अल्टो कारने पंढरपूरला निघाले होते. सकाळी ९ च्या सुमारास त्यांची कार म्हसवड ओलांडून धुळदेव गावच्या हद्दीत पोहोचली. या ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडलेला असल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. खड्डा चुकवण्यासाठी किंवा वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कारने तीन ते चार पलट्या खाल्ल्या. यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.
ग्रामस्थ आणि पोलिसांची तत्परता
अपघाताची माहिती मिळताच धुळदेव येथील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना गाडीबाहेर काढले व म्हसवड पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पो. कॉ. अभिजीत भादुले, पो. ना. लुबाळ व पो. हवा. हांगे यांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमींना म्हसवड येथील संचित रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने साताऱ्याला पाठवण्यात आले.
रखडलेल्या कामामुळे २० जणांचा बळी; ग्रामस्थ आक्रमक
या अपघातानंतर धुळदेवचे ग्रामस्थ प्रशासनावर प्रचंड आक्रमक झाले आहेत. सातारा-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग असून धुळदेव हद्दीतील रस्त्याचे काम गेल्या ८ वर्षांपासून रस्ते विकास महामंडळाने रखडवले आहे. काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने केली, मात्र प्रशासनाने केवळ बोळवण केली. याच कारणामुळे येथे आजवर जवळपास ३०० हून अधिक छोटे-मोठे अपघात झाले असून, सुमारे २० जणांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे.
ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
म्हसवड माण नदी पूल, दिवस करंज ओढा पूल व धुळदेव ओढा पुलासह रस्त्याची कामे गेल्या आठ वर्षांपासून ठेकेदाराने अपूर्ण अवस्थेत ठेवली आहेत. परिणामी येथे अपघातांची अखंडित मालिका सुरू असून अनेक जणांना प्राणास मुकावे लागले आहे. या दुर्घटनांना जबाबदार असणाऱ्या रस्ता व पुलाच्या बांधकाम ठेकेदारासह संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी म्हसवड व तालुक्यातील पत्रकारांसह ग्रामस्थांना आता पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा द्यावा लागत आहे.

