
थेट WhatsApp वर मिळवा
महाराजा मल्टीस्टेट संस्थेने स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे सभासदांचा विश्वास जपला असून २०२५-२६ आर्थिक वर्षात २ कोटी ३५ लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०५ ऑक्टोबर : महाराजा मल्टीस्टेट संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढता असून संस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात २ कोटी ३५ लाख ३ हजार रुपयांचा नफा मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली. संस्थेच्या सोळाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना चेअरमन दिलीपसिंह भोसले यांनी ही माहिती दिली.
व्यावसायिक विस्तार आणि अत्याधुनिक सुविधा
संस्थेने काटकसर आणि पारदर्शक कारभाराच्या जोरावर तीन वेळा नॅशनल अवॉर्ड पटकावला आहे. सभासदांसाठी कोअर बँकिंगसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नवीन प्रधान कार्यालय देखील सुरू करण्यात आले आहे. भविष्यात संस्थेचे रूपांतर ‘मल्टीपर्पज’मध्ये करून रुग्णालय, शाळा आणि विविध व्यवसाय सुरू करण्याचा मानस व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी व्यक्त केला.
वार्षिक सभा उत्साहात संपन्न
या वार्षिक सर्वसाधारण सभेस सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा अॅड. मधुबाला भोसले, प्रियदर्शनी भोसले, तुषार गांधी, हेमंत फुले, हणमंत जगताप, विलास रसाळ, कुमार भट्टड, दीपराज तावरे, निलेश मोरे, अमोल सस्ते आणि सुभाष आढाव उपस्थित होते. विषय पत्रिकेचे वाचन व सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जगताप यांनी केले, तर संचालक निलेश मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.





