स्थैर्य, मुंबई, दि.२५: एमजी मोटर इंडियाच्या गुजरातेतील वडोदरामधील संपूर्ण महिला क्रूने ५०,००० व्या एमजी हेक्टरची निर्मिती केली आहे. ही गोष्ट म्हणजे कार्यक्षेत्रात लिंगभेदाला स्थान नसल्याचा पुरावा आहे. या पुढाकाराच्या अंतर्गत ही निर्मिती अथपासून इतिपर्यंत महिलांनी केली आहे व अशाप्रकारे या कंपनीने विविधतेसह (जो या कारनिर्मात्या कंपनीचा एक आधार स्तंभ आहे) एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे. ही एक अभूतपूर्व अशी घटना आहे. यात संपूर्ण महिलांच्या टीमने शीट मेटल्सच्या पॅनल प्रेसिंगपासून वेल्डिंग, पेंटिंग आणि उत्पादनानंतर टेस्ट रनपर्यंत सगळी कामे केली आहेत.
एमजी मोटर इंडियाचा अत्याधुनिक असा उत्पादन कारखाना गुजरातच्या हालोल (पंचमहाल जिल्हा) येथे आहे. ब्रिटिश वारसा चालवणार्या या कार उत्पादन कंपनीच्या कर्मचार्यांमध्ये तब्बल ३३% वाटा महिलांचा आहे, जो या क्षेत्रात विशेषच म्हटला पाहिजे. येथे, महिला व्यावसायिक आपल्या पुरुष सह-कर्मचार्यांच्या खांद्याला खांदा भिडवून सर्व प्रकारची कामे करतात.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव चाबा म्हणाले, “एमजी हा पहिल्यापासून एक पुढारलेला ब्रॅंड आहे. विविधता, समुदाय, इनोव्हेशन आणि अनुभव हे त्याचे स्तंभ आहेत. आम्हाला वाटते की, यामुळेच एक ब्रॅंड म्हणून आमचा दृष्टिकोन अधिक व्यापक होऊ शकला आहे आणि व्यवसायाच्या सर्व कामांमध्ये आमच्या कार्यक्षमता सक्रिय झाल्या आहेत. संपूर्ण-महिला टीमने निर्मिलेली आमची ५०,०००वी एमजी हेक्टर ही महिलांचे यातील योगदान आणि परिश्रम यांची गौरवगाथा सांगते. यातून हे देखील प्रतीत होते की, ऑटोमोबाइल निर्मितीसारख्या एके काळच्या पुरूषांचे वर्चस्व असणार्या उद्योगात देखील आता महिलांना कुठलीच आडकाठी राहिलेली नाही. आमची खात्री आहे की, यामुळे भारतातील आणि विदेशातील आणखी जास्त महिलांना ऑटोमोटिव्ह उद्योगात दाखल होण्याची प्रेरणा मिळेल.”
हीच परंपरा पुढे नेत, आपल्या संघटनेत भविष्यात ५०% लिंग विविधता साध्य करून एक संतुलित कर्मचारी-गट उभा करण्याचे एमजी चे लक्ष्य आहे. स्थापना झाल्यापासून या ब्रॅंडने आपल्या फोकसचे मुख्य क्षेत्र म्हणून आपल्या हालोल उत्पादन प्लांटच्या जवळच्या स्थानिक पंचायतींसोबत काम केले आहे. असे केल्याने अधिकाधिक तरुण महिलांना एमजी प्लांटमधल्या सुरक्षित वातावरणात काम करण्याची प्रेरणा मिळाली.
२०१८ पासून, एमजी ने विविध पुढाकारांच्या माध्यमातून आपल्या उत्पादन कारखान्यात अनेक महिला कामगार नोकरीवर ठेवले आहेत. आज या महिला प्लांटमध्ये उत्पादनातील महत्त्वाची कामे करत आहेत. शिवाय, एमजी चा हालोल येथील अत्याधुनिक प्लांट ऑटोमेटेड गाइडेड वेहिकल्स आणि विविध वर्कशॉप्ससाठी रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (आरपीए) ने सुसज्ज आहे. ही कार उत्पादन कंपनी आरपीएचा उपयोग बॉडी शॉपमध्ये रोबोटिक ब्रेझिंगसाठी, पेंट शॉपमध्ये रोबोटिक प्रायमर आणि टॉप कोटिंगसाठी आणि जीए शॉपमध्ये रोबोटिक ग्लास ग्लेझिंगसाठी करते.
व्यवस्थित प्रशिक्षण दिल्यास महिला आणि पुरुष हे दोघेही एकसारख्याच क्षमतेने मशीनरी हाताळू शकतात. या पुरोगामी विचारसरणीमुळे आजवर श्रम-केंद्रित मानल्या जाणार्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात एमजी मात्र स्त्री पुरुष दोघांनाही समान संधी देत आहे.