महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत ९ शैक्षणिक संस्थांचे सामंजस्य करार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२९ जानेवारी २०२२ । मुंबई । कोविड 19 सारख्या जागतिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षणाकडून ऑनलाईनकडे यावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांची जीवनशैली बदलली. या बदललेल्या जीवनशैलीमुळे विद्यार्थी मानसिक तणावाच्या स्थितीकडे जाऊ नयेत यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि राज्यातील विविध नऊ शैक्षणिक संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि विविध शैक्षणिक संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी  ऊर्जामंत्री नितीन राऊत, आमदार रोहित पवार,  उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक विनायक निपुण  विविध शैक्षणिक संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.

मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणामुळे मित्रपरिवार, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद कमी झाला आहे. यामुळे विद्यार्थी सतत तणावाच्या वातावरणात स्वतःला असुरक्षित समजू लागल्याचे चित्र दिसत आहे. देशाच्या विकासाला गती देण्यात युवा पिढीची मोठी भूमिका आहे. या युवा पिढीचे मानसिक आरोग्य संभाळणे गरजेचे आहे त्यामुळे या शैक्षणिक संस्थानी यासंदर्भात पुढाकार घ्यावा आणि बदललेली जीवनशैली, विद्यार्थ्यांचे करिअर, मानसिक आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, भविष्यातील रोजगाराभिमुख मार्गदर्शन करावे  असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले.

या सामंजस्य करारामध्ये आयसीटी, मुंबई आणि विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे, डॉ. आंनद नाडकर्णी यांची आयपीएच आणि डॉ. हमीद दाभोळकर यांची परिवर्तन ट्रस्ट,  एसएनडीटी विद्यापीठ, सेंट झेविअर्स कॉलेज, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, सर जे जे स्कूल ऑफ आर्ट, डेक्कन इस्टिट्यूट, पुणे यांचा समावेश आहे.

या विविध संस्थांच्या माध्यमातून मानवी जीवनातील कला, संस्कृती, पुरात्तत्व, माहिती तंत्रज्ञान, स्त्री पुरुष समानता, दिव्यांगांसाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग, विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन अशा विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.


Back to top button
Don`t copy text!