दैनिक स्थैर्य | दि. २३ नोव्हेंबर २०२३ | कोळकी | कोळकी ग्रामपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभा सरपंच सौ. सपना कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बोलवण्यात आली होती; परंतु सरपंच सौ. सपना कोरडे ह्या अभ्यास दौऱ्यावर गेल्या आहेत. मासिक सर्वसाधारण सभेसाठी सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने मासिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली नाही. तहकूब सभा पुन्हा दि. २८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही महिन्यापासून ग्रामपंचायतीच्या कारभारावर सर्वच सदस्यांची नाराजी असल्याचे दिसून येत होते आयोजित मासिक सभेलाच सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे गाव म्हणून कोळकी गावाची ओळख हि संपूर्ण जिल्ह्यात आहे. अश्या ह्या कोळकी गावामध्ये विरोधी गटाचा एकही उमेदवार गट ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेला नाही; ज्यांनी गटातून बाहेत पडत बंडखोरी केली तेच निवडून आले आहेत. कोळकी ग्रामपंचायतीमध्ये सर्वच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य हे श्रीमंत संजीवराजे यांच्याच विचाराचे आहेत. तरीसुद्धा सदस्यांनीच मासिक सभेवर बहिष्कार टाकल्याने विविध प्रश्न उपस्थित राहत आहेत. नक्की सदस्यांनी बहिष्कार टाकण्याचे कारण काय आहे ? यावर ग्रामपंचायत वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.