
स्थैर्य, विडणी, दि. २४ सप्टेंबर : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५’ मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी विडणी (ता. फलटण) येथे उद्या, गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत ‘महास्वच्छता’ आणि ‘महाश्रमदान’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी दिली.
या अभियानांतर्गत लोकसहभागातून गावातील ओढे, नाले, गटारी आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली जाणार आहे. तसेच, गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आणि आवश्यक ठिकाणी खड्डे भरण्याचे कामही श्रमदानातून केले जाणार आहे.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे, गावच्या एकूण लोकसंख्येइतकी झाडे लावण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभही उद्याच केला जाणार आहे. शासनाच्या नियोजनानुसार गावच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग वाढवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या महाअभियानात सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.