ध्यानात ध्यान हवे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


आजकाल तुमचं आमचं कश्याव ध्यान आहे. हेच आपल्यालाच ध्यानात नाही. सध्या ध्यानाचे वर्ग भरमसाट पैसे घेऊन सुरु आहेत. तिथं सुद्धा आपलं ध्यान असतं का? हा खरा संशोधनाचा भाग आहे. आपलं ध्यान स्वास्थ्य संभाळण्यावर आहे का? भाळण्यावर आहे.हेच ध्यानात येत नाही.

आपण दुसऱ्यावर जेवढं ध्यान देतो. तैवढं जर स्व वर दिलं .तर बरेच सफल होईल. ध्यान लागतच नाही. मन सैरावैर फिरतय. अंगी लागत नाही. पुरतं पडत नाही. पचनी पडना. पथ्य सरना.यावर काय उपाय आहे का. सोपा मार्ग गरजा कमी करणं. समाधानी राहणं. तुलना करु नये. हव्यास परीस जे भेटलं तेच हवं म्हणून प्रगतीपथावर रहावं.

साधं जीवन गणित आहे. तळ्याकाठी बगळा ध्यानस्त. सुंदर ते ध्यान, पांढरा शुभ्र रंग, कमनीय अंगकाठी, लांबलचक मान, इवलेसे मिटलेले नयन, पायाची कमान. खरंच हे सारं बगळे रुपडं बघून बिचारी भोळी भाबडी मासोळी हे रुपडं बघून जवळ येते. दर्शनाच्या आशेने मासोळी बगळ्याच्या चरणी येताच. चपळ मासोळी सुद्धा क्षणात बगळ्याच्या चोचीतून प्वाटात जाऊन पुन्हा ध्यानस्त बसतो.

हेच ध्यान चमकणारं असतं. फसवं असतं. आपलपोटी असतं. आज समाज्यात ही आपल्यावर ध्यान ठेवणारं असतं. आपण दुसऱ्यावर ध्यान ठेवतो. त्याचवेळी नेमकं आपणांवर अचूक ध्यान ठेवणारं असतं. प्रत्येकला वाटतं माझं किती बारीकसारीक गोष्टीवर ध्यान आहे. हे कुणाच्या ध्यानातच येत नाही.

आजकाल मानसिक ध्यानधारणेची नितांत गरज आहे. आज सगळं सुख आपल्या पायाशी लोळण घेतं. पण आपलं ध्यानच लागत नाही. ब-याच वेळा आपलंच आपलं ध्यानव ध्यान राहत नाही. शारीरिक आजार लौकरं बरा होईल. पण ध्यानस्त समस्या कशी सोडवायाची हीच खरी मेख आहे. भौतिक साधन सामुग्री असूनही चिडचिडपणा वाढतो आहे. मनाची चंचलता भरकटू लागली आहे. मी पणाचा कळस झाला आहे. नैतिकतेचा पाया ढासळू लागला आहे. आत्मीक शांततेला सुरुंग लागला आहे. संपूर्ण शारीरिक व मानसिक समाधानाला वाळवी लागली आहे. मनाला अनेक मागण्यारुपी भिरुडांने पोखरले आहे. भरजरी वस्त्रे व कातडीच्या आत धगधगता ज्वालामुखी कवा बाहेर पडेल सांगता येत नाही. भरदार , वजनदार व्यक्तीमत्वे मुळासकट उनमळून पडली आहेत. लहानसान गोष्टीं मिळाल्या नाहीत म्हणून जीव वेठीस धरणारी तरुणाई दिसतेय. खरंच आपला प्रवास कोणीकडून कोणीकडे सुरू आहे. हेच आपल्या ध्यानात नाही.

आपल ध्यान दुसऱ्याची निंदा, नालस्ती , टीका , टोमणे यावरच आहे. फरक एवढाच आपणाला बरं वाटतं . पण त्याचवेळी कुणीतरी आपल्या कर्तृत्वाचा ढोल बडवत असतो. आपलं ध्यान दुस-यावर , त्याच आपल्यावर हा सारा खेळ सुरुच असतो.

आपलं ध्यान प्राप्त परिस्थितीत समाधानी असावं. आपलंच आपण आत्मपरिक्षण करावं. भल्या पहाटं उठावं. जागं व्हावं. भगवंताच स्मरण करावं.

कराग्रे वसते लक्ष्मीः करमूले सरस्वती
करमध्ये तु गोविंदः प्रभाते करदर्शनम्

रामप्रहारी रम्य नैसर्गिक नयनरम्य सोहळ्याचा आनंद घ्यावा. हे सर्व ध्यानपूर्वक करावं. धुकं , गारवा, दवबिंदू , हिरवंगार धरतीमातेचा भरजरी शालू , तुडुंब भरलेल्या विहीरी , खळखळते वाहणारे नाले , ओढे ,नदी डोळे भरुन पाहावं. अनवाणी पायानं धरतीमातेला चरण लागताच दवबिंदूचा अभिषेक सुरु होतो. मातीचा ऊबदार लेप , लुसलूसीत गवताच्या कोवळ्या लहरी स्पर्श करुन जाताना सारं शरीर मोहारुन जातं. पूर्वेकडे विविध रंगाची जणू रंगपंचमी व मुक्त हस्ते सूर्यनारायणांची सोनेरी किरणं भेटीस येतात. त्यांना मनसोक्त भेटावं. न्याहाळंव. चालणं सुरुच आहे. बोलणं मनाशी सुरु आहे. ध्यान श्वासांवर आहे. गती चालण्यात आहे. डोळ्यांत सृष्टीच वैभव साठवलं जातं आहे. प्रसन्नता , चैतन्य , मंगलमयता या त्रिगुणी त्रैमुर्तीचा नादब्रह्म सुरु आहे.

खरंच ह्या भगवंताच्या सानिध्याला आपण आपल्या पद , पैसा, प्रतिष्ठा यांने मुकत चाललो आहे. ध्यान सीमेवरील सैनिकांवर असावं . उनाताणात राबणा-या बळीराजांकडं असावं , वारीच्या वाटेवरं चालत असणा-या निष्ठावंत वारक-यांवर असावं. मातेच्या ममतेवर , लेकरांच्या हास्यांवर , ज्येष्ठांच्या अनुभूतीच्या सुरकत्यांवरा , तरुणाईच्या चंचलतेवर , गृहिणीच्या जबाबदारींवर , भूकेल्या , तहानल्या नजरेवरं असावं. हे सारं ध्यानात यावं लागतं असेल तर आपलं ध्यान असावं ध्यानस्त ,आसनस्त व्हावं. चित्त एकाग्र असावं. मन समाधानी असावं. माणसांत माणूस व माणुसकीत सदैव रहावं.

प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!