दैनिक स्थैर्य । दि. ०१ सप्टेंबर २०२२ । कराड । प्रसारमाध्यमांचे बदलते स्वरुप समजून घेण्यासाठी सध्याच्या लोकशाहीचे बदलते स्वरुपसुद्धा नव्या पिढीतील पत्रकारिता, प्रसारमाध्यम, समाजमाध्यम, डिजीटल माध्यम प्रतिनिधी आणि तरुण विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. सध्या धार्मिक व व्यक्तिकेंद्रीत भुलभुलैय्यामधून पत्रकारिता व लोकशाही संरक्षित करणारी अभिव्यक्ती कमी होत चालली आहे. धर्मकेंद्रित राजकारणामुळे इथून पुढे ‘धर्म’ महत्त्वाचा की ‘भाकरी’ महत्त्वाची याचा विचार समाजात रुजविण्याचे काम एक आव्हान म्हणून सर्वच स्तरावरील माध्यम प्रतिनिधींना करावे लागणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ, राष्ट्रीय शिक्षा अभियान व कराड तालुक्यातील पत्रकार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा.एन.डी. पाटील सभागृहात आयोजित राज्यस्तरीय एक दिवसीय मराठी पत्रकार कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र बेडकिहाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सदस्य अॅड.सदानंद चिंगळे तर व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ सदस्य किसनराव पाटील (घोणशीकर), संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अॅड.रविंद्र पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन राजमाने, दै.पुढारीचे सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, संपादक डिजीटल लोकमत न्यूज आशिष जाधव, ज्येष्ठ लेखक, पत्रकार विजय चोरमारे यांची सन्माननीय उपस्थिती होती.
सध्या धर्मकेंद्रित राजकीय सत्तेमुळे लोकशाहीचे महत्त्वाचे स्तंभ असलेले प्रसारमाध्यम, न्यायपालिका व प्रशासन, तपास यंत्रणा निष्पक्ष व भयमुक्त नाहीत ही लोकशाहीच्या अंतर्गत हुकुमशाहीकडे जाण्यासाठीचीच्या वाटचालीतील धोक्याची घंटा आहे. अशावेळी जिथे धर्मनिरपेक्षवादी लोकशाहीवर उघड किंवा छुपे हल्ले होत असतील तर तिथेतिथे केवळ प्रसारमाध्यमांनीच नव्हे तर समाजातील सर्वच प्रभावशाली क्षेत्रातील घटकांनी अभिव्यक्त होऊन निर्भयपणे प्रबोधन केले पाहिजे अशी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट करताना रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ही गरज 2014 नंतरच्या काळात यापुढेही आवश्यक आहे.
राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील प्रसारमाध्यमांनी स्थानिक विकासाच्या, गरजेच्या प्रश्नाकडे आधी पाहिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन बेडकिहाळ म्हणाले, आपल्या माध्यमांमुळे समाजात द्वेष, दुही फैलावणार नाही, तरुणांची माथी भडकावली जाणार नाहीत याची दक्षता घेतली पाहिजे. जे राजकीय नेते, धार्मिक नेते अशा प्रकारची भाषा बोलत असतील तर त्यांना प्रसिद्धी देताना खपापेक्षा समाजहिताचे तारतम्य प्राधान्याने राखले पाहिजे
* डिजीटल न्यूज गतिमान; त्यासाठी या क्षेत्रात आव्हाने *
आज दूरदर्शन वाहिन्या, डिजीटल न्यूज वृत्तपत्रे, समाजमाध्यमे क्षणाक्षणाला माहिती, राजकारण, अन्यक्षेत्रे यातील विश्लेषण, मुलाखती, तात्काळ प्रतिक्रिया याबाबतीत वेगवान झाल्या आहेत. प्रेक्षकांना काय हवे, टीआरपी वाढवणे यात मुलभूत पत्रकारिता हरवत चालली आहे कां? याची भिती वाटते असे सांगत डिजीटल माध्यम तज्ज्ञ आशिष जाधव यांनी प्रसारमाध्यमे, आधुनिक तंत्रज्ञानाचा आवाका यातील बदल व आव्हाने याची सविस्तर विविध अनुभवावर आधारित विवेचन केले. 2014 नंतर, कोरोनाची 2 वर्षे नंतर व आता 2021-22 नंतरचा आढावा घेऊन आशिष जाधव यांनी सांगितले की, डिजीटल न्यूजमध्ये काम करताना आपल्या बातमीचा, माहितीचा उपयोग समाजासाठी हितकारक होतो कां? याकडेही सजगपणे लक्ष असायला हवे. विशिष्ट विचार, त्याचा प्रसार करताना हे समाजभान असायला हवे. यात येणार्या नव्या पत्रकारांनी हे तंत्रज्ञान समजून घेऊन त्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्याची भूमिका एक आव्हान समजून घेतली पाहजे. यात काहीवेळा निर्भिडतेमुळे, आपल्याला वरिष्ठांच्या मर्जीनुसार पत्रकारिता करता येणार नाही. अशावेळी नोकरी जाण्याचीही उदारहणे घडत आहेत. पण तरीही समाजहिताची अन्यायाविरुद्धची पत्रकारिता करण्यासाठी आपण जिथं असू तिथून भूमिका घेत राहिली पाहिजे. त्यासाठी स्वत:चा आवाज ओळखता आला पाहिजे.
यावेळी पत्रकार देवदास मुळे (कराड), सूर्यकांत शिंदे (शिराळा), विनोद मोहिते (माण), रुपेश कदम, बाळासाहेब हरणावळ यांनीही पत्रकारितेतील व त्या माध्यमातून करीत असलेली विविध कामे यावर आपली मते परखडपणे व्यक्त केली.
कराड पत्रकारितेतील तरुण आवाज प्रमोद सुकरे, विकास भोसले, देवदास मुळे व त्यांच्या सर्व सहकारी पत्रकारांनी आणि उपप्राचार्य प्रा.शिवाजीराव पाटील, प्रा.माधुरी कांबळे, प्रा.नेताजी सुर्यवंशी, प्रा. डॉ.तानाजी पाटील, डॉ.उत्तम मोरे, डॉ.रमेश पोळ, डॉ.बाबासाहेब नाईक, डॉ.राजेंद्र गायकवाड, डॉ.प्राजक्ता निकम, डॉ.गिरीष कल्याणशेट्टी यांच्यासह सहकार्यांनी ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ.प्राजक्ता निकम, प्रास्ताविक व स्वागत प्रा.डॉ.बाळासाहेब नाईक यांनी तर प्रा.डॉ.तानाजी पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यशाळेसाठी कराड, शिराळा, माण व परिसरातील पत्रकार, महाविद्यालयीन प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.