माध्यमांनाच माध्यमांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलावेसे वाटत नाही : प्रशांत कदम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 21 फेब्रुवारी 2024 | पुणे | बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’च्या माध्यमातून जी निर्भीड पत्रकारिता केली त्याचा विचार आजच्या पत्रकारितेशी केल्यास आजची स्थिती चिंताजन असल्याचे चित्र आपल्याला दिसते. कारण एका अहवालानुसार वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकात जगातील 180 देशामध्ये भारताचा नंबर 160 वा आहे. या स्थितीबद्दल माध्यमे आवाज उठवत नसून माध्यमांनाच माध्यमांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलावेसे वाटत नाही. ही बाब गंभीर आहे, असे मत तरुण पत्रकार, राजकीय समिक्षक प्रशांत कदम यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थांच्यावतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रशांत कदम बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व राजकीय समिक्षक अरुण खोरे, म.सा.प चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, संस्थेचे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, म.सा.प.च्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आज माध्यमांचं स्वरूप बदलत चाललेलं आहे, तसा त्यांचा दर्जाही खालावतो आहे. वास्तविक तंत्रज्ञानाने दिलेली ही संधी असून जनतेच्या मनातील प्रश्‍न व सभोतालच्या घडणार्‍या परिस्थीतीबद्दल माध्यमांनी तटस्थपणे आपली भूमिका मांडली पाहिजे, मात्र आजच्या स्थितीत राजकीय नेत्यांची परस्पर विधाने व आपापसातील हेवेदावे यामुळे राजकीय नेत्यांच्या हातात माध्यमांचा अजेंडा गेला असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. यापूर्वी व येत्या काळात देशात जी आंदोलने झाली व होत आहेत. जनतेला ही समज आली आहे की, माध्यम काय दाखवितात व काय दाखवीत नाहीत, त्यामुळे उपलब्ध पर्यायांचा वापर करून ते याबाबत जाणून घेतात. दृष्यश्राव्य माध्यमांच्या या काळात मुद्रित माध्यमांमधील प्रत्येक शब्दाला प्रतिष्ठा आहे. मात्र हे शब्द चमकदार करण्याच्या नादात बातमीतील मुल्य हरवता कामा नये, असा आशावाद कदम यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्रशांत कदम यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या ‘दर्पण पुरस्कारा’ने अरुण खोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

माध्यमांची भूमिका वस्तुनिष्ठ व तटस्थ असली पाहिजे, मात्र आजच्या मध्यमामधून होणारी जाहिरातबाजी याचा जनमानसावर किती परिणाम होतो का? याचा शोध माध्यमांनी घेतला पाहिजे.माध्यमांचे केंद्रीकरण ही मोठी शहरे झाली असून ग्रामीण भागातील आपल्या आजूबाजूला घडणार्‍या गोष्टी वर ही माध्यमांच लक्ष असल पाहिजे,असे प्रतिपादन अरुण खोरे यांनी व्यक्त केले.पूर्वीच्या पत्रकारीतेमधील अभ्यासपूर्ण बातमीपत्रे,सूचक स्तंभ,अभ्यासपूर्ण वादविवाद हे माध्यमतून हरवत चालली आहेत काय?याच चिंतन होणे गरजेचे आहे.आजकाल राजकीय नेत्यांची माध्यमातून येणारी विधाने ही महाराष्ट्राला शोभणारी नाहीत ही अतिशय खेदजनक बाब आहे.भारतीय पत्रकारितेची कमी होत असलेली विश्‍वासहर्ता अनेक अहवाल व निरीक्षणे यामधून प्रसिद्ध होत असते,ही बाब लोकशाहीला मारक आहे.समाजाने देखील आपली भूमिका स्पष्टपणे मांडणे गरजेचे असल्याचे मत खोरे यांनी व्यक्त केला.

बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण मधून समाजाचं प्रतिबिंब अधोरेखित होत असे ही परंपरा पुढे लोकमान्य टिळक,आगरकर,आचार्य अत्रे यांनी कायम राखली मात्र आजच्या पत्रकारीतेमध्ये या गोष्टी कडे दुर्लक्ष होते आहे का? याचा विचार होणे गरजेचे असून या मध्ये साहित्यिकांची भूमिका ही महत्वाची असल्याचे मत प्रा.मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

रवींद्र बेडकिहाळ यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्य कर्तृत्व समाजापुढे आणण्यासाठी करीत असलेल्या कार्याचा आढावा घेऊन गेली 37 वर्षे पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी शासनदरबारी करीत असलेल्या कार्याचा आढावा घेतला.

प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत रवींद्र बेडकिहाळ यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सुनिताराजे पवार यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!