मायणीच्या विद्यार्थिनींची संशोधन अनुदानासाठी निवड


दैनिक स्थैर्य । 22 जुलै 2025 । सातारा । मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील सुहानी कदम व निकिता काटकर या विद्यार्थिनींच्या लघुसंशोधन प्रकल्पाची शिवाजी विद्यापीठाकडून अनुदानासाठी निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे यांनी दिली.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला चालना मिळावी, या हेतूने शिवाजी विद्यापीठाने ही लघुसंशोधन योजना सुरू केली आहे. त्या योजनेत सहभागी होण्यासाठी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात बीए भाग तीन शिकत असलेल्या सुहानी कदम व निकिता काटकर यांनी तयारी दर्शविली.

त्यासाठी भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. उत्तमराव टेंबरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. मायणीसह परिसरातील कानकात्रे, सूर्याचीवाडी व येरळवाडी तलाव (ता. खटाव) क्षेत्रातील पक्षी अधिवासाचा अभ्यास हा विषय त्यांनी लघुसंशोधनासाठी निवडला. त्याविषयी सर्वांगीण अभ्यास करून सुहानी व निकिताने माहिती मिळविली. मायणी परिसरातील ठिकठिकाणच्या पक्षी आश्रयस्थानांचा परिचय, तेथे आढळणार्‍या स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांच्या विविध जाती यांचा अभ्यास करण्यात आला.

मायणी परिसरात पड जमिनी व माळराने मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे येथे टिटवी, धावीक, चंडोल, रातवा असे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले, तसेच रोहित, करकोचे, चमचाचोच (स्पूनबिल), शराटी, जांभळी पाणकोंबडी, खंड्या, कंकर यासह बदकांच्या विविध जाती असे असंख्य स्थानिक व स्थलांतरित पक्षी तेथे हिवाळ्यात आढळून येत असल्याचे त्यांनी संशोधनात नमूद केले आहे.

त्या नानाविध पक्ष्यांचा अभ्यास या संशोधनात मांडण्यात आला आहे. त्याचे सादरीकरण त्यांनी शिवाजी विद्यापीठाकडे केल्यानंतर निवड समितीने त्याची अनुदानासाठी निवड केली. विद्यापीठाकडून त्या संशोधनास दहा हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

संशोधन कार्यात भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. उत्तम टेंबरे, प्रा. स्वाती माळी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. दरम्यान, विद्यापीठाकडून अनुदान मिळाल्याबद्दल शिक्षण संस्थेचे चेअरमन अध्यक्ष सुरेंद्र गुदगे, सचिव सुधाकर कुबेर, प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!