दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२१ । मायणी । ओमायक्रॉन विषाणूच्या संभाव्य प्रादुभवामुळे संपूर्ण देशभरात खळबळ माजली असून याच पार्श्वभूमीवर मायणी येथील रिंगावण यात्रेवरही याचा परिणाम दिसून येणार असून जनतेच्या आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी मायणी येथील सिध्दनाथ मंदिरात पार पडलेल्या यात्रा आढावा बैठकीत येथील श्री सिध्दनाथ रथोत्सव रिंगावण यात्रेत फक्त धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून करमणूक कार्यक्रमाना यंदाही फाटा देण्यात येणार असल्याचा निर्णय ट्रस्ट, मायणी ग्रामस्थ ,प्रशासन व पोलीस विभागाकडून घेण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले.
श्री सिध्दनाथ मंदिरात पार पडलेली ही बैठक खटाव तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे, सपोनि मालोजी देशमुख, ग्रा. सदस्य रणजित माने, विनोद पवार, मार्केट कमिटी चे माजी संचालक दादासो कचरे, यात्रा कमिटी अध्यक्ष भीमराव देशमुख, पीएसआय शीतल पालेकर, डॉ. विकास देशमुख, प्रकाश कणसे, अरुण जाधव, अनिल माळी, पोलीस पाटील प्रशांत कोळी, संजय पोरे, ट्रस्टचे मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
यानिमित्ताने बोलताना जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे म्हणाले, यात्रेच्या धार्मिक कार्यक्रम नियोजन व करमणुकीच्या कार्यक्रमासाठी सालाबादप्रमाणे याहीवर्षी यात्रा कमिटीची निर्माण करण्यात आली आहे. कोरोना काळात गेली दीड वर्ष नियमाच्या चाकोरीत राहून मायणीतील देवस्थानांना धार्मिक कार्यक्रमांना मुभा मिळाली होती. मायणीच्या ग्रामस्थांनी प्रशासनास सदैव सहकार्य केलेच आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देऊन यंदाच्या वर्षीही करमणुकीच्या कार्यक्रमांना बगल देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे. प्रशासनाने देवस्थानच्या रथोत्सवास लोकांना सामाजिक अंतर ठेऊन रथपुजनांची व पालखी सोबत मानकरी लोकांना परवानगी द्यावी. जेणेकरून ट्रस्ट विश्वस्त,यात्रा कमिटी,प्रशासन व पोलीस यंत्रणा यांच्या समन्वयातून श्री सिध्दनाथ रथोत्सव रिंगावन यात्रा सुरळीत पार पडेल.
यावेळी खटावचे तहसीलदार किरण जमदाडे म्हणाले, मायणी यात्रेतील धार्मिक कार्यक्रम होणार आहेतच, परंतु अचानक उद्भवलेल्या विषाणू प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आलेल्या नियमांच्या अनुषंगाने करमणुकीचे कार्यक्रम रद्द करून रथाचे जागेवरच पूजन करणे, यात्रेसंबंधीत ट्रस्ट कमिटी मानकरी यांचे सर्वांचे लसीकरण तसेच आरटीपीसीआर टेस्ट होणे अनिवार्य आहे त्याचबरोबर भाविकांना सामाजिक अंतर ठेऊन दर्शनाची रांग आत व बाहेर जाण्यासाठी बॅरिगेट्स ट्रस्टमार्फत लावण्यात याव्यात.
वडूज पोलीस स्टेशन चे सपोनि मालोजीराव देशमुख म्हणाले,शासकीय पातळीवरून येणाऱ्या आदेशांचे पालन करण्याची जबाबदारी ग्रामस्थांवर असून धार्मिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी शासकीय नियमाचे पालन करून प्रशासनास सर्वांनी सहकार्य करावे. उपस्थितांचे आभार अनिल माळी यांनी केले.