स्थैर्य, मायणी, दि. 30 : मायणी येथील मायणी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दि 26 व 28 रोजी पोलिसांनी मिळालेल्या खबरीच्या आधारे अवैध चोरटी वाळू वाहतुकीवर कारवाई करत 4 लाख 9 हजार रूपयांचा मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतले. तर दुसर्या एका कारवाईन अवैध विदेशी दारू पकडून 6 लाख 57 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल व दोघांना ताब्यात घेत दोन वेगवेगळ्या कारवाईत एकूण 10 लाख 66 हजार 600 रुपयांचा (दहा लाख सहासष्ठ हजार सहाशे रुपये) मुद्देमाल जप्त केल्याची माहिती शहाजी गोसावी यांनी दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, 26 रोजी रात्री 9 वाजता शहाजी गोसावी यांना आटपाटी बाजुकडून तरसवाडी घाटातून कलेढोण बाजूकडे एक बिगर नंबरचा काळ्या कागदाचा हुड असलेला निळ्या रंगाचा टेम्पो वाळू घेवून जाणार असल्याची माहिती मिळाली. याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून रात्री दहा वाजता एक टॅम्पो मुळीकवाडी फाटा येथून कलेढोण बाजुकडे जाताना पाहिला. सदर टॅम्पोवरील चालकास इशारा करुन टॅम्पो थांबविला व टॅम्पोमध्ये काय आहे, असे विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पोलिसांनी टॅम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसली. या प्रकरणी अवैध वाळू वाहतूक करणार्या प्रणव शशिकांत साळुंखे (वय- 19 रा.घानंद, ता आटपाडी, जि. सांगली) यास ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत चार लाख रुपयांचा एक निळ्या रंगाचा टाटा कंपनीचा 608 टॅम्पो व अंदाजे नऊ हजार रुपयांची दीड ब्रास वाळू (गौण खनिज), असा एकूण 4 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दि. 28 रोजी मायणी पोलिसांनी सायंकाळी 6 च्या सुमारास मायणी पोलीस दूरक्षेत्र येथे हजर असताना पोलीस उपनिरिक्षक गोसावी यांना मिळालेल्या खबरीनुसार विखले फाटा येथे सापळा रचून पडळ ते कलेढोण जाणार्या मार्गावर इनोव्हा कार (क्र. एम. एच. 04 केके 1053) मधुन बेकायदा विदेशी दारुची चोरटी वाहतूक करुन घेवून जात असलेल्या उध्दव किसन गायकवाड (वय- 37) व विक्रम भीमराव गायकवाड (वय- 25 दोघे रा. चिंचाळे, ता. आटपाडी, जि. सांगली) या दोघांना अवैध विदेशी दारू वाहतुकीप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सहा लाख रुपयांची एक राखाडी रंगाची इनोव्हा कार व त्यामध्ये असणारी 57 हजार 600 रुपये किमतीचे विदेशी दारूचे 8 बॉक्स असा एकूण 6 लाख 57 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (क),(ड), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवाईत दोलताडे, बापूराव खांडेकर, नवनाथ शिरकुळे, प्रकाश कोळी, योगेश सूर्यवंशी, प्रवीण सानप या पोलीस कर्मचार्यांनी सहभाग घेतला. मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी तपास करीत आहेत.