मायणी तलाव ओसंडून वाहू लागला


 

स्थैर्य, मायणी, दि. 5 : गतवर्षी 5 वर्षातून ब्रिटिशकालीन तलाव हा ऑक्टोबर भरून वाहू लागला होता. यंदा हा तलाव ऑगस्ट महिनाअखेरच भरल्याने या भागातील शेतकरी वर्ग आनंदला असून गावाच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे.

याबरोबर यंदा वनविभाग स्थानिक संघटना, संस्था यांना सोबत घेऊन पक्षी व वन संवर्धनचे काम हाती घेणार असून यामुळे या कामास गती प्राप्त होणार आहे. तलाव ओसंडून वाहू लागल्याने चांद नदीच्या प्रवाहात वाढ होऊ लागली आहे. दरवर्षी सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. यामुळे महापूरच वातावरण निर्माण होते पण खटाव, माण या दुष्काळी भागातील तलाव भरण्यास ऑक्टोबर, नोव्हेंबरचे महिने उजाडत. यंदा याला अपवाद ठरत ना महापूर, ना सलग लागून राहिलेली संततधार तरीही सर्वत्र झालेली जलसंधारणाची कामे यामुळे गतवर्षीच्या पाणीसाठा सर्वत्र थोड्याफार प्रमाणात टिकून होता. त्यात सातत्याने जोरदार नाही परंतु हलक्या सरी पडत राहिल्याने यंदा मायणीचा तलाव ऑगस्ट महिन्यातच ओसंडून वाहू लागला आहे. मायणी ब्रिटिशकालीन तलावात कलेढोण, पाचवड, विखळे, भिकवडी, कान्हरवाडी, पडळ या परिसरामधून पाणी येत असते.  यावर्षी अद्याप कानकात्रे तलाव ओसंडला नाही. तरीही मायणी तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढल्याने तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

काही वर्षापूर्वी चांद नदी साफ करून पात्र रुंदावल्यामुळे आणि ठिकठिकाणी बांधलेले माती व सिमेंट ओव्हरफ्लो पाण्याने भरून वाहू लागल्याने मायणीसह शेडगेवाडी, चितळी गावासही याचा फायदा होणार आहे. शेतीपाण्याचा प्रश्‍न मार्गी मायणी ब्रिटिशकालीन तलाव कालव्याच्या व चांद नदीच्या लाभक्षेत्रात हजारो एकर शेतीक्षेत्र आहे. यंदा तलाव वेळेत भरल्याने मायणी शेडगेवाडी (चितळी) या गावांतील शेतकर्‍यांना याचा मोठा फायदा होणार असून शेती पाण्याचा मायणी पूर्व-दक्षिण कडील प्रश्‍न मार्गी लागल्याने शेतकरी सुखावला आहे.

सध्या चांद नदीतून येरळा नदीमार्गे पाणी सांगली जिल्ह्यात दरवर्षी विनावापर जात असून हे पाणी शेतकर्‍यांच्या मागणीनुसार कालव्याद्वारे सोडल्यास याचा फायदा शेतकर्‍यांना होईल. प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकर्‍यांच्या हितावह विचार करावा

रणजित माने, ग्रामपंचायत सदस्य मायणी.

पक्षी व वन संवर्धन कामास येणार गती सातारा जिल्ह्याच्या नैसर्गिक व ऐतिहासिक सौदर्यात भर टाकणारा दुष्काळी भागातील ठेवा म्हणजे मायणी पक्षी आश्रयस्थान व ब्रिटिशकालीन तलाव. यंदा स्थानिक युवकांनी गावातील संघटना, सामाजिक संस्था याना एकत्र करीत मुख्य जुनी बाग, जुनी रोपवाटिका याचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेतले. याची दखल मुख्य वन संरक्षक यांनी घेत याठिकाणी भेट देऊन येरळवाडी, सूर्याचीवाडी, कानकात्रे व मायणी या चार तलावाना पक्षी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा मिळवून देणार असल्याचे सांगितले. स्थानिकांना सोबत घेऊन हे काम वनविभाग पार पडणार असून तलावही भरल्याने याठिकाणी असणारा पाणीप्रश्‍न ही मार्गी लागला असून यामुळे पक्षी व वन संवर्धन कामास गती प्राप्त होणार आहे.

डॉ.अमोल चोथे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!