
स्थैर्य, मायणी, दि.०२: मायणी ता. खटाव येथील 65 हेक्टर क्षेत्र असलेल्या पक्षी संवर्धनामध्ये आज सकाळी अकरा वाजता शॉर्ट सर्किट मुळे या वनक्षेत्राला अचानक आग लागली. या आगीवर वन कर्मचारी,मायणीतील युवक व ग्रामस्थांकडून वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मायणीची वनसंपदा वाचविण्यात यश आले.
येथील मायणी-म्हसवड रोड लगतच्या बाजूस विद्युत खांबावरून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आज गुरुवार सकाळी अकराच्या सुमारास या वनक्षेत्राला आग लागली ही माहिती येथील वनरक्षक सौ. संजीवनी खाडे यांना समजताच त्यांनी वन कर्मचार्यांना याची माहिती दिली. माहिती मिळताच मायणी गावचे पोलीस पाटील प्रशांत कोळी, वनरक्षक पी.बी. पारधी, वनरक्षक के.डी. मुंडे व युवकांनी व मायणी ग्रामपंचायत कर्मचारी आणि वन कर्मचार्यांनी एकत्र येऊन आग आटोक्यात आणली. यामुळे मायणीची वनसंपदा वाचवण्यात यश आले. यावेळी पोलीस पाटील प्रशांत कोळी यांनी अनिल कचरे यांचा माती टाकण्यासाठी जेसीबी व रस्ता कॉन्ट्रॅक्टर यांनी पाण्याचा टँकर आग आटोक्यात आणण्यासाठी देण्याची विनंती केली. त्यामुळे आग लवकर आटोक्यात आली.