दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
निरगुडी (ता. फलटण) येथील शुभांगी चंद्रशेखर गायकवाड या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून जाचहाट केल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रशेखर हनुमंत गायकवाड, मंदा हनुमंत गायकवाड, हनुमंत भगवान गायकवाड, शुभम हनुमंत गायकवाड, विश्वास भगवानराव गायकवाड, चुलत सासू हेमलता विश्वास गायकवाड, चुलत दीर शंभू विश्वास गायकवाड (सर्व राहणार निरगुडी, तालुका फलटण) व नणंद राणी स्वप्नील ठोंबरे (राहणार डिस्कळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणाची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, निरगुडी (ता. फलटण) येथील विवाहिता शुभांगी चंद्रशेखर गायकवाड (मूळ राहणार निरगुडी, तालुका फलटण, सध्या राहणार गोखळी, तालुका फलटण) हिचा डिसेंबर २०२० ते डिसेंबर २०२३ या कालावधीत पती व सासरच्या लोकांनी जाचहाट करत मानसिक व शारीरिक त्रास देऊन विवाहितेचे वडील व भाऊ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच विवाहिता व तिची मुलगी चारवी हिचे शारीरिक व मानसिक छळ केला, तसेच ‘फ्लॅट घ्यायला तुझ्या वडिलांकडून ११ लाख घेऊन ये’, असे म्हणून विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित विवाहितेने तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वरील आठजणांवर जाचहाट प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एएसआय एक्के करत आहेत.