मातोश्री नर्मदा कोकरे यांचा सहस्त्रचंद्र दर्शन कृतज्ञता सन्मान सोहळा ग्रंथतुलेने संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ४ जून २०२३ | फलटण |
मातोश्री नर्मदा महादेव कोकरे (अहिल्यानगर पणदरे) यांचा सहस्त्रचंद्र दर्शन कृतज्ञता सन्मान सोहळा ग्रंथतुलेने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत व शब्दसुमनांच्या कौतुकानं संपन्न झाला. भीमथडीच्या तटावर कर्‍हा नदीच्या साक्षीने बारामतीनगरीत नातेवाईक, हितचिंतक, स्नेही, मित्रपरिवार, साहित्यिक, आध्यात्मिक, शैक्षणिक व राजकीय मान्यवरांनी यावेळी मातोश्रींचं अभिष्टचिंतन केले.

मातोश्री नर्मदा यांचा खडतर जीवनप्रवास, अपार कष्ट, हालअपेष्टा, खास्ता खाऊन नेटाने संसार केला. स्वतः अक्षर ओळख असणार्‍या मातेने तिन्ही सुपुत्रांवर संस्कार केले. थोरले साहित्यिक प्रा. रवींद्र (फलटण), मधवे महेंद्र इंजिनियर (बारामती), धाकटे प्रोफेसर डॉ. दादासाहेब (नागपूर) यांना शिक्षण देऊन सामाजिक जाणीव करून दिली. अत्यंत सोशिकपणा, मनाची निर्मळता, मृदू स्वभाव, वाणी प्रासादिक, आदरतिथ्याची आवड यामुळे नर्मदा आई सर्वांची जवळीक साधणारी मर्मठेव आहे. एकत्रित कुटुंबातील जडणघडण, माहेर खेड, ता. खंडाळा येथील आई-वडीलांची शिकवण, पती महादेव (आबा) यांची खंबीर साथ यामुळे ‘नर्मदारत्न’ घडले.

सहस्त्रचंद्र दर्शन कृतज्ञता सन्मान सोहळ्यात नामवंत साहित्यिकांच्या कलाकृतीने ग्रंथतुला करून तिथंच सर्वांना वाटप करण्यात आले. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भगवतगीता, प्रेरणादायी पुस्तके ते नर्मदा आईच्या सुपुत्राच्या थापणूक कथासंग्रहाने ग्रंथतुला करण्यात आली.

यावेळी रवींद्र बेडकिहाळ, हभप प्रा. राजेंद्र आगवणे, सोपनाराव आटोळे, युवराज खलाटे, अ‍ॅड. प्रियदर्शनी कोकरे, हभप डी. आर. सलगर, प्रकाशराव देवकाते, हभप शिवाजी घाडगे, अमरसिंह जगताप, हभप बापूराव सालगुडे आदी मान्यवरांनी समयोचित मनोगते व्यक्त केली.

सूत्रसंचलन हभप केशव महाराज जाधव यांनी केले. केकला फाटा देऊन फल छेदन करून सन्मान सोहळा संपन्न केला. या सोहळ्यास मराठा विद्या प्रसारक समाज संस्था फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण, सकल संत वारकरी संघटना फलटण, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठान, दि माळेगांव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ शिवनगर, बारामती साहित्य कट्टा, विरगुंळा ज्येष्ठ नागरिक संघ सांगवी, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण समिती सांगवी, नाथसन फर्मस सांगवी, जय तुळजाभवानी मंडळ व राजमाता तरुण मंडळ अहिल्यानगर (पणदरे), विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे कौतुक यावेळी सर्वांनी केले.


Back to top button
Don`t copy text!