
स्थैर्य, फलटण, दि. ४ ऑक्टोबर : तालुक्यातील मठाचीवाडी येथील सुपुत्र प्रा. हृषिकेश कृष्णा चव्हाण यांना पुणे येथील डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची पेट्रोलियम इंजिनिअरिंग या विषयातील आचार्य (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून भूगर्भातील खनिज तेल साठे शोधणे आणि उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले.
त्यांच्या या संशोधनामुळे नवीन तेल साठे अधिक वेगाने शोधण्यास आणि उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे. या संशोधनासाठी त्यांना डॉ. राजिब के. सिंहराय यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. चव्हाण यांनी एमआयटी कॉलेज, पुणे येथून शिक्षण घेतल्यानंतर इंग्लंडमधील साऊथ बँक युनिव्हर्सिटीमधून एम.एस. ही पदवी प्राप्त केली. त्यांनी एमआयटी कॉलेजमध्ये सात वर्षे सहायक प्राध्यापक म्हणूनही सेवा बजावली आहे. सध्या ते बंगळूर येथील एका नामांकित पेट्रोलियम इंजिनिअरिंग कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल मठाचीवाडी व फलटण तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.