दैनिक स्थैर्य | दि. ७ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
मातंग समाजाचे नेते, मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र पाटोळे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
राजेंद्र पाटोळे हे फलटण विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक होते. मात्र, त्यांना संधी न मिळाल्याने त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता; परंतु शेवटच्या दिवशी त्यांनी तो मागे घेतला.
यावेळी राजेंद्र पाटोळे यांनी निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मातंग समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच महायुतीचे उमेदवार सचिन कांबळे-पाटील यांना निवडणुकीत पूर्ण समर्थन जाहीर केले व मातंग समाजाच्या मागण्यांचे निवेदन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, फलटण तालुक्यातील मातंग समाजातील लोकांचा आजपर्यंत फक्त वापर करण्यात आला. त्यांना विकासापासून वंचित ठेवण्यात आले. याबाबत समाजाचा तीव्र भावना आहेत. पाटोळे यांच्यासारखा कार्यकर्ता विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी गावोगावी फिरला. उमेदवारी मागितली, वातावरण तयार केले. मात्र, त्यांना संधी नाकारली. त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला. पाटोळे यांनी फलटण तालुक्यातील समाजासाठी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या सोडवल्या जातील. फलटण शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा राहणार असून त्यास मंजुरी मिळालेली आहे. अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळालं पाहिजे, अशी माझीही मागणी आहे, त्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यावेळी राजेंद्र पाटोळे यांनी माजी खासदार रणजितसिंह यांना मातंग समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले.
राजेंद्र पाटोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.