
स्थैर्य, विडणी, दि. २९ सप्टेंबर : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील सोळावे पुष्प, मौजे समतानगर (विडणी) येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात धम्मगुरू पूज्य भदंत काश्यप यांना पंचांग प्रणाम करून करण्यात आली.
यावेळी, “त्यागमूर्ती माता रमाई यांचे जीवनचरित्र” या विषयावर भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ अभ्यासक आयु. सोमिनाथ घोरपडे यांनी प्रेरणादायी प्रवचन दिले. त्यांनी आपल्या मनोगतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणप्रवासात माता रमाई यांनी केलेला त्याग, गरिबीतही दाखवलेले धैर्य आणि पतीच्या महान कार्यासाठी दिलेली साथ, अशा प्रसंगांतून रमाईंचा त्यागमय जीवनपट उलगडला. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा ग्रंथ बाबासाहेबांनी ‘प्रिय रामू’ला अर्पण करताना लिहिलेल्या अर्पणपत्रिकेचा संदर्भ देताना उपस्थितांचे डोळे पाणावले.
याप्रसंगी पूज्य भदंत काश्यप यांनी उपासकाने भिक्षूंना करावयाच्या ‘याचने’चे पाली भाषेतून सविस्तर विश्लेषण केले. तसेच, भारतीय बौद्ध महासभेचे फलटण तालुका अध्यक्ष आयु. महावीर भालेराव यांनी रमाईंच्या जीवनकार्यावर आधारित गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमास महासचिव आयु. बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे, संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे यांच्यासह पंचशील मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. बजरंग गायकवाड यांनी केले.