‘जगात त्यागमूर्ती फक्त रमाईच!’ – फलटण तालुक्यात १२९ वी जयंती धम्ममय उत्साहात; महिलांचा पुढाकार


कोळकी, विडणी व राजाळे येथे माता रमाई आंबेडकर यांची १२९ वी जयंती विविध सामाजिक व धम्मकार्यक्रमांनी साजरी. महिलांचा मोठा सहभाग, समाजप्रबोधनाचा संदेश.

स्थैर्य, फलटण, दि. ०७ फेब्रुवारी : त्याग, समर्पण आणि संघर्षाची जिवंत मूर्ती मानल्या जाणाऱ्या माता रमाई आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त फलटण तालुक्यातील कोळकी, समता नगर (विडणी) आणि राजाळे येथे विविध सामाजिक व धम्मकार्यक्रमांनी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमांत महिलांचा मोठा सहभाग असून धम्ममय वातावरणात सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.

कोळकी येथील शाहू, फुले, आंबेडकर सभागृह, बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई महिला ग्रुप कोळकी व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत जयंती साजरी केली. धम्मदानातून उपस्थित उपासक-उपासिकांना फलाहार वाटप करण्यात आले. तसेच रजनीताई माने यांनी स्वकमाईतून खीरदान करून कुशलकर्माचा संदेश दिला. काही कार्यकर्त्यांनी बिस्कीट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

नुकत्याच धम्मदीक्षा घेतलेल्या कुटुंबीयांनीही उत्साहात सहभाग घेतला. सोनगाव बंगला येथील विक्रम निकाळजे यांच्या चिरंजीव पियुष यांच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून भारतीय बौद्ध महासभेमार्फत प्रकाशित ‘धम्मयान’ कॅलेंडरचे वाटप करण्यात आले. या कृतीचे सर्वत्र कौतुक झाले.

समता नगर (विडणी) येथे पंचशील तरुण मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी झाली. बौद्ध उपासक-उपासिका, बालक-बालिका व मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर मार्गदर्शन करत समाजप्रबोधन करण्यात आले.

राजाळे येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष महावीर भालेराव यांनी ठाम प्रतिपादन केले की, “जगात त्यागमूर्ती फक्त रमाईच होऊ शकते.” त्यांनी सांगितले की, रमाई यांनी आपल्या आयुष्यातील हालअपेष्टा सहन करत कुटुंबाचा भार सांभाळला आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वतःच्या चार मुलांचा औषधोपचाराअभावी मृत्यू झाला, तरीही त्यांनी ध्येयापासून माघार घेतली नाही, हा त्याग इतिहासात अद्वितीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमांमध्ये रमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह रमाईंच्या जीवनकार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन करण्यात आले.

संपूर्ण तालुक्यातील कार्यक्रम भक्तीमय, प्रेरणादायी व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे ठरले.


Back to top button
Don`t copy text!