नुकसानग्रस्तांना भरीव मदत केली जाईल – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सिंधुदुर्गनगरी, दि. २३: मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मालवण, देवबाग, किल्ले निवती, मेढा, वेंगुर्ला, पंढरीनाथवाडी आदी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.  संपूर्ण नुकसानीचा  पंचनामा झाल्यानंतर नुकसानग्रस्तांना मदत करताना शासन हात आखडता घेणार नाही. सढळ हाताने भरीव मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी पाहणी दौऱ्यात दिली.

यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी उपस्थित होते. मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी नकुसानग्रस्त भागाची पाहणी करुन नुकसानग्रस्तांशी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, तोक्ते वादळामुळे नुकसान मोठे झाले आहे. पंचनाम्यांचे आदेश दिले असून घरांचे पंचनामे जवळपास संपत आले आहे. शेतीचे आणि फळबागांचे पंचनामेही सुरु आहेत. ते ही लवकरच पूर्ण होतील. कोकणवासियांना भरीव मदत केली जाईल. कोणालाही  नाराज न करता सढळ हाताने कशी मदत केली जाईल ही भूमिका शासनाची आहे. संरक्षण बंधारे बांधण्यासाठी तातडीने मंत्रालयात बैठक बोलावली जाईल त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही ते म्हणाले.

संबंधित सर्व विभागांनी व्यवस्थित पंचनामे करावेत

कृषी, मत्स्य विभाग यांच्यासह संबंधित सर्व विभागांनी नुकसानग्रस्त भागातील व्यवस्थित पंचनामे करावेत, अशा सूचना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.

श्री. वडेट्टीवार यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर वेंगुर्ला येथील फळ संशोधन केंद्रात आज आढावा बैठक घेतली.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागातील शेतीचे पंचनामे लवकर करावेत. त्यासाठी इतर ठिकाणाहून मनुष्यबळ मागवावे. संरक्षण बंधारे बांधले नाहीत तर भविष्यात गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी संबंधित विभागाने सविस्तर अहवाल सादर करावा.

कोरोना रुग्णांचा मृत्यूदर रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावीत. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची ॲन्टीजेन चाचणी करावीत. संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा. कोरोना प्रतिबंधक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावीत. पोस्ट कोविड रुग्णांबाबतही दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

४ लाख मदतीच्या धनादेशाचे वितरण

तोक्ते चक्रीवादळावेळी देवगड येथे झालेल्या नौका दुर्घटनेतील मृत  दिनेश गजानन जोशी आणि राजाराम कृष्णा कदम यांच्या वारसाना प्रत्येकी 4 लाखाचा धनादेश मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या हस्ते आज देण्यात आला.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संगणकीय सादरीकरण करत तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. पोलीस अधीक्षक श्री. दाभाडे यांनीही प्रतिबंधात्मक कारवाहीची माहिती दिली.

बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. श्रीपाद पाटील, महावितरणचे अधीक्षक अभियंता  विनोद पाटील,  सावंतवाडीचे प्रातांधिकारी सुशांत खाडेकर,  वेंगुर्लाचे तहसिलदार प्रविण लोकरे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!