कृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल ऍपचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० जानेवारी २०२२ । पुणे । सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या नव्या स्वरुपातील मोबाईल ऍपचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास आमदार व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ सभापती दिलीप मोहिते, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था अनिल कवडे पणन संचालक तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ सुनिल पवार, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दिपक शिंदे, नाबार्ड व डी. एम. आयचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

मोबाईल अॅपमुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. शेतमालाचे बाजारभाव व कृषि पणनविषयक माहिती उपलब्ध असलेल्या या मोबाईल ऍपचा शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर वापर करावा असे आवाहन मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी केले.

सध्या मोबईलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून आवश्यक माहिती एसएमएस अथवा ऍपद्वारे सहज उपलब्ध होत आहे. शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करत आहेत. कृषि पणन मंडळ राबवित असलेले विविध प्रकल्प, योजना व उपक्रम तसेच बाजारभाव याबाबत माहिती शेतकरी, बाजार समित्या, बाजार घटक व सर्वसामान्यांना सहजरित्या उपलब्ध करुन देण्यासाठी कृषि पणन मंडळाने मोबाईल ऍप अद्ययावत केले आहे.

या ऍपद्वारे कृषि पणन मंडळाच्या माहिती व्यतिरीक्त राज्यातील व इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव, शेतकरी उत्पादक कंपन्यांची माहिती, बाजार समित्यांची संक्षिप्त माहिती, कृषि पणन मित्र मासिक, फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण, सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था आदी माहिती उपलब्ध आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांना त्यांच्या आवारात आवक होणाऱ्या शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबत माहिती कृषि पणन मंडळाच्या ऍपद्वारे सहजरित्या भरता येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील बाजारभावाची माहिती एकत्रित करणे सोईचे होणार आहे. शेतमालाची थेट विक्री अथवा खरेदी करण्यासाठी विक्रेता व त्याचा शेतमाल आणि खरेदीदार व त्याचा शेतमाल याबाबत माहिती प्रसिद्ध करण्याची सुविधा या ऍपद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे मोबाईल ऍप गुगल प्ले स्टोअर व ऍप स्टोअरवर एमएसएएमबी (MSAMB) या नावाने मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.

अॅपमुळे मोबाईलद्वारे शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव, शेतकरी उत्पादक कंपन्या,कृषि पणन मित्र मासिक, राज्यातील सर्व बाजार समित्यांची संक्षिप्त माहिती,शेतमाल विक्रेता व खरेदीदार, कृषि पणन मंडळ राबवित असलेले विविध प्रकल्प, योजना व उपक्रमाची माहिती सहजरित्या मिळेल अशी माहिती पणन संचालक श्री.पवार यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!