मराठवाडा मुक्ती गाथा ( भाग -1 )


दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । लातूर । मराठवाडा हे नाव पडले कसे…?

मराठवाडा स्वातंत्र्य होऊन 17 सप्टेंबर रोजी 74 वर्षे पूर्ण होऊन 75 वर्षात प्रवेश करेल.. त्यानिमित्ताने मराठवाडा काय होता.. इथे निजामशाही कशी आली.. त्या निजामशाहीच्या काळात काय परिस्थिती होती. त्या हुकूमशाही विरोधात जो लढा उभा राहिला तो कसा उभा राहिला आणि अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी हा भाग निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झाला ते आपण.. आज पासून रोज सतरा सप्टेंबर पर्यंत जाणून घेऊ या….!!

मराठवाडा हे नाव कसे पडले

सम्राट अशोकाच्या 16 महाजनपदा पैकी दोन महाजनपदे एक अश्मक आणि दुसरे मूलक हे गोदावरीच्या खोऱ्यात नांदणारी.. हे दोन्ही महाजनपदात बहुतांश लोकं महाराष्ट्री प्राकृत बोलणारी.. सातवाहन राजा हाल यांनी 700 गाथा एकत्र करून संपादित केलेला ” गायासप्तशती ” म्हणजेच गाथा सप्तशती ही प्राकृत मधून असलेली निर्मिती… यात या गोदावरी खोऱ्यातील लोकांचे लोक जीवन प्रतिबिंबीत झाले आहे. यातून एकच ध्वनीत होते की हा प्रदेश म्हणजे मराठीचे आद्य रूप महाराष्ट्री प्राकृत बोलणारा प्रदेश… पुढे अनेकांनी या प्रदेशावर आपली हुकूमत गाजवली आणि 1724 मध्ये दिल्लीची सुभेदार निजाम उल मुल्क या निजामशहाने हैद्राबाद मध्ये निजामशाही स्थापन केली. यात तीन भाषा बोलणारे प्रदेश होते.. एक तेलगू ( आंध्र ), कन्नड ( कर्नाटक ) आणि मराठी ( मराठवाडा ).. यात लातूर म्हणजे पूर्वाश्रमिचा उस्मानाबाद जिल्हा मराठी बोलणाऱ्या लोकांचा शेवटचा भाग.. म्हणजे निजामाच्या काळात भाषे प्रमाणे प्रदेशाची नावे झाली आणि मराठी बोलणाऱ्या लोकांचा मराठवाडा हे नाव कायम झाले.

मराठ्यांच्या लातूर जिल्ह्यातील हालचाली

अहमदनगरच्या निजामाच्या पाडावानंतर दक्षिणेत आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन सम्राज्यांनी मुघलांचे मांडलिकत्व पत्करले. 3 मार्च 1707 औरंगजेबचा मृत्यू झाला आणि 12 जानेवारी 1708 साली साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्यावर मराठेशाहीचा पुन्हा झेंडा फडकला आणि छत्रपती शाहू महाराज गादीवर आले. मराठ्यांचा राज्य विस्तार झपाट्याने झाला. धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, दादो मल्हार, संभाजी निंबाळकर हे सरदार मराठ्यांच्या मोहिमेचे नेतृत्व करत होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलशाही कुमकुवत झाली. या दोन्ही शाह्या त्यांच्या मुघलांच्या मांडलिकत्वाखाली होत्या. वेळोवेळी निजाम आणि मराठयात तह होत गेले.. अनेक सुभ्यात मोठा महसूली हिस्सा मराठ्यांना मिळत होता. 27 डिसेंबर 1732 रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या साम्राज्याचे पेशवे बाजीराव व चिम्माजी आप्पा आणि निजाम यांची लातूर पासून आठ मैलावर मांजरा नदीच्या काठी असलेल्या रुई – रामेश्वर येथे ऐतिहासिक भेट झाली.

( संदर्भ :-अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन,- यझदानी, मोघलकालीन मराठवाडा,- ल. गो. काळे, छत्रपती शिवाजी महाराज – ग. ह. खरे )

क्रमशः

@युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर


Back to top button
Don`t copy text!