
मराठी भाषा साहित्य आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन, संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली. याचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई (सातारा) येथे कार्य सुरु आहे. मराठी ही राजभाषा, ज्ञानभाषा, मातृभाषा, बोलीभाषा म्हणून मान्य पावली आहे. आजच्या धावत्या युगात इंग्रजी ही जगण्याची भाषा बनली असली तरी संस्कृतीची खाण असणाऱ्या भाषेत सुद्धा व्याहारिकता वापरल्यास जागता येते.
उपयोजित मराठीने अनेक व्यवसायिक संधी निर्माण करुन दिल्या आहेत. आपण पाल्याला उत्तम मराठीचे अद्ययावत ज्ञान दिल्यास त्याचे जगणं सुसाह्य होईल. वक्तत्व, संभाषण, प्रवचन, कीर्तन, भारुड, कथाकथन, काव्य गायन, रेडिओ निवेदक, शाहिर, लावणी, सुत्रसंचलन इ. अंगाने मराठी भाषेचा विचार केल्यास सुप्त कलागुणांना वाव मिळून भाषिक कौशल्ये विकसीत होतील.
मायमराठीतून शिक्षण घ्यावे. पदवी पर्यंत मराठी विषय सक्तीचा हवा. प्रत्येकांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा. प्रशासनात सर्वच क्षेत्रात मराठीचा आग्रह धरावा. पालकांनी इंग्रजीचा अट्टाहास जरुर धरावा पण पाल्य काकणभर मातृभाषेत सरस ठरावा याकडे लक्ष दिल्यास मराठीला वैभवशाली दिन निश्चित येतील. प्रत्येकाने किमान या पंधरावड्यात आपआपल्या परीने मराठी भाषेची जनजागृती करावी.