दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । मराठी केवळ भाषा नव्हे, आपला प्राण आहे. अप्रतिम शब्दरचना हीच मराठी भाषेची समृद्धी आहे. प्राथमिक शाळेत शिकलेलो म्हणी, वाक्प्रचार, अलंकार आणि आपल्या मूळांत खोलवर रुजलेला आहे. मराठी भाषेतला अनोखा ठेवा आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही अश्या अनेक पिढ्या जन्माला आल्या. मराठी भाषेचे हे वेगळेपण जपण्यासाठी आणि वैयक्तिक आयुष्यात मराठी भाषा जोपासण्यासाठी, ती पुढील पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान असायला हवे असे मराठीची थोरवी जगविख्यात ज्येष्ठ न्यूरोस्पायनल सर्जन डॉ पी एस रामाणी यांनी दादर येथे गायली. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा दिन धुरू हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. उपस्थितांना आवाहन करताना रामाणी असेही म्हणाले की, मराठी प्रेम एक दिवसापर्यंत मर्यादित नसून, यापुढे प्रत्येक दिवस मराठी म्हणून जगूया.
तर सुप्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने म्हणाले की, प्रशासकीय सेवेत असताना मी रुग्णांची नाळ सोडली नाही. सकाळी आठपासून संध्याकाळपर्यंत मी रुग्णांना भेटत राहिलो त्यांना माझ्यासमोर बसवून माझ्या गावाकडच्या बोलीभाषेत संवाद साधत राहिलो. त्यामुळे लाखो रुग्णांना मी कुणीतरी जवळची व्यक्ती आहे असा विश्वास वाटू लागलो. मी खेडेगावात मातृभाषेतच शिक्षण घेतले नावलौकिक मिळवला. त्यामुळे अनुभवांती मी खात्रीने सांगू शकतो. इंग्रजी ही फक्त पोपटपंची करण्यासाठी आहे खरे ज्ञान मातृभाषेतूनच मिळते. अपमान-अपयशाचा अनुभव तुमच्यासारखा माझ्याही आयुष्यात आला, पण मी जिद्द सोडली नाही. ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत झाडांना पाणी घालून मिळालेल्या पैशातून अभ्यास केला. उच्चारांनी ज्ञानात किंवा हुशारीत फरक पडत नाही हे सिद्ध करण्यासाठी खूप अभ्यास केला. डॉ लहाने साहेबांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना बदलत्या परिस्थिती वर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले की, मराठी भाषेवरचे आक्रमण सहन करू नका. मोबाईलमुळे घराघरातला संवाद संपला आहे. पूर्वी माणूस शंभर पाने वाचायचा आता शंभर शब्द सुद्धा ऐकण्याची क्षमता त्याच्यापाशी राहिली नाही.
तर मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळाचे प्रमुख विश्वस्त श्री प्रमोदभाई शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्रात जन्मलेल्या आपल्या सर्वांना माय मराठीने सर्वांना सर्वकाही दिले. ओळख आणि ज्ञान भरभरून दिली, परंतु माणसाचे संस्कारित मन बऱ्याचदा सैरभैर होते. माणुस वर वर दिसतो तितका खंबीर असेलच असं नाही….मनात वेगळी खळबळ असु शकते त्याच्या जी आपल्या पर्यंत पोहोचत नसते किंवा त्या आनंदी आणि सुखी चेहऱ्याच्या आड लपवत असतो,लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शकतो. पण त्यासाठी मनशांती आणि मनशक्ती ची गरज आहे. आपल्या उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव यांनी मराठी भाषेचा शाहीर, कीर्तनकार, कथाकार, कादंबरीकार, कवी यांनी मराठी भाषा कशी समृद्ध केली याचे विवेचन आपल्या भाषणात केले.
यावेळी व्यासपीठावर दासावाच्या प्रमुख कार्यवाह शुभा द कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे ऍड देवदत्त लाड, विकास होशिंग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक दिवंगत शरद वर्तक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या अमृत महोत्सवी चळवळीचा आढावा घेताना गेली ४८ वर्षे दिवाळी अंकांचे संपादक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करीत असल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व संपादकांचे आभार मानले. तर दासावाचे कार्याध्यक्ष मनोहर साळवी यांनी वाचनालयाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. वाचन चळवळीतील योगदानाबद्दल प्रदीप कर्णिक यांना दत्ता कामथे स्मृती पुरस्कार तर मराठी भाषेत शिवकालीन इतिहासाचा आयुष्यभर धांडोळा घेत इतिहास प्रेमींचे ग्रंथदालन समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ इतिहास संशोधक अभ्यासक आप्पा परब यांना सेवाव्रती सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंकांचा पारितोषिक वितरण करताना मनोरंजनकार’ का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक – महाराष्ट्र टाइम्स, चंद्रकांत पाटणकर पुरस्कृत जगन्नाथ शंकरशेठ स्मृती उत्कृष्ट अंक – सकाळ अवतरण, पांडुरंग रा भाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक – मुक्त आनंदघन, पास्कोल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक अंक – गोवन वार्ता, पु ल देशपांडे स्मृती सर्वोत्कृष्ट अंक -कालनिर्णय, साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक -अधोरेखित, मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक – मनशक्ती, कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट अंक – श्रमकल्याण युग, याशिवाय उत्कृष्ट अंक म्हणून शब्दमल्हार,नवरंग रुपेरी, कनक रंगवाचा, पुरुष स्पंदनं,शब्दगांधार, समदा, सह्याचल, ठाणे नागरिक, त्याचप्रमाणे उल्लेखनीय अंक म्हणून – संस्कार भक्तिधारा, क्रीककथा, कालतरंग, शैव प्रबोधन, धगधगती मुंबई,निशांत, सत्यवेध, गावगाथा यांना प्रदान करण्यात आले.
मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत कामगार नेते वसंतराव होशिंग स्मृती ‘मराठी कॅलिग्राफी शब्द स्पर्धा, शाखाप्रमुख संजय भगत (प्रभादेवी) पुरस्कृत (१) मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या (२) जागतिकीकरण आणि मराठी भाषा या विषयावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धेचा पारितोषिक वितरण झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषेचे अभ्यासक सुरेश परांजपे मराठी रंगभूमीवर गाजलेल्या व्यक्तींची मिमिक्री तर कवयत्री अनघा तांबोळी यांचा तरल काव्यानुभव ‘केवल प्रयोगी’ चे सादरीकरण झाले. संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन राजन देसाई यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, माजी अध्यक्ष विजय कदम, नितीन कदम, दिगंबर चव्हाण, दिलीप ल सावंत, सुनील कुवरे, दत्ताराम गवस, प्रशांत भाटकर, आदेश गुरव यांनी विशेष मेहनत घेतली.