‘माझा मराठाचि बोलु कौतुकें…’ कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ विशेष; ‘अभिजात’ सन्मानाने उजळली मायबोलीची ऐतिहासिक परंपरा!


२७ फेब्रुवारी हा वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. अलिकडेच मिळालेला ‘अभिजात भाषा’ दर्जा, संत परंपरा आणि डिजिटल युगातील मराठीची वाटचाल याचा वेध घेणारा हा विशेष लेख. (लेखक: युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, पुणे)

स्थैर्य, पुणे, दि. 27 फेब्रुवारी : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन संपूर्ण महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जातो. हा दिवस केवळ स्मरणाचा किंवा उत्सवाचा नसून तो आत्मपरीक्षणाचा आणि आत्मगौरवाचा आहे. “माझा मराठाचि बोलु कौतुकें” या संतवचनाच्या प्रेरणेने मराठी भाषेच्या ऐतिहासिक परंपरेचा, साहित्यिक वैभवाचा आणि नुकत्याच मिळालेल्या अभिजात स्वरूपाचा सुसंगत आढावा घेणे या निमित्ताने अत्यंत संयुक्तिक ठरते.

मराठीची प्राचीन मुळे आणि ‘गाथा सप्तशती’

मराठी भाषेची पाळेमुळे प्राचीन ‘महाराष्ट्री प्राकृत’मध्ये खोलवर रुजलेली आढळतात. सातवाहन कालखंडात प्रतिष्ठान नगरी (म्हणजेच आजचे पैठण) हे राजकीय व सांस्कृतिक घडामोडींचे प्रमुख केंद्र होते. त्या काळात महाराष्ट्री प्राकृत ही लोकव्यवहार, प्रशासन आणि साहित्यनिर्मितीची अत्यंत प्रभावी भाषा होती. सातवाहन राजा ‘हाल’ यांनी संकलित केलेली ‘गाथा सप्तशती’ ही काव्यरचना या भाषिक परंपरेचा सर्वात भक्कम पुरावा मानली जाते. इ.स.पूर्व दुसरे शतक ते इ.स. दुसरे शतक या कालखंडातील सामाजिक, सांस्कृतिक आणि भावविश्वाचे प्रतिबिंब यातून दिसते. प्रेम, निसर्ग, ग्रामजीवन आणि स्त्री-पुरुष संबंधांचे सूक्ष्म दर्शन घडवणारी ही रचना मराठीच्या भावविश्वाची खऱ्या अर्थाने आद्य पायाभरणी ठरते.

महाराष्ट्री प्राकृत ते अपभ्रंश आणि पुढे ‘प्राचीन मराठी’ असा भाषिक विकासक्रम उलगडत जातो. शिलालेख, ताम्रपट आणि दानपत्रांतून मराठीच्या आरंभीच्या स्वरूपाचे अनेक पुरावे मिळतात. यादवकालीन प्रशासनात मराठीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. याच काळात मराठीला खऱ्या अर्थाने लोकभाषेचे बळ लाभले आणि ती ज्ञानप्रसाराचे प्रभावी माध्यम बनली.

संतांची कृपा आणि स्वराज्याची राजभाषा

संतपरंपरेत संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला एक भक्कम तात्त्विक अधिष्ठान दिले. ‘भावार्थदीपिका’ (ज्ञानेश्वरी) आणि ‘अमृतानुभव’ या ग्रंथांमधून त्यांनी संस्कृतातील गहन तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसाच्या लोकभाषेत आणले.

“माझा मराठाचि बोलु कौतुकें, परि अमृतातेहि पैजा जिंके” या त्यांच्या वचनातून मराठीच्या अभिव्यक्तीशक्तीवरील अढळ आणि सार्थ विश्वास प्रकट होतो. त्यानंतर संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्यासह वारकरी संप्रदायातील संत परंपरेमुळे अभंग-ओव्यांतून मराठीची अध्यात्मिक व सामाजिक परंपरा अधिक व्यापक आणि समृद्ध झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात मराठीला केवळ लोकभाषा न ठेवता ती ‘राज्यकारभाराची भाषा’ बनवली. त्यातूनच ‘राजव्यवहार कोष’, पत्रव्यवहार, आज्ञापत्रे यांमधून मराठीची प्रशासकीय ताकद संपूर्ण जगाने पाहिली. स्वराज्य स्थापनेच्या प्रक्रियेत मराठीने स्वाभिमानाचे रूप धारण केले. पुढे मुद्रणयंत्राच्या आगमनाने वृत्तपत्रे, ग्रंथप्रकाशन आणि आधुनिक साहित्यप्रकार विकसित झाले. कादंबरी, नाटक, कविता, ललितलेखन, समीक्षा, पत्रकारिता या सर्व क्षेत्रांत मराठीने आपली स्वतंत्र आणि ठसठशीत ओळख निर्माण केली.

कुसुमाग्रजांचा संदेश आणि ‘अभिजात’ सन्मान

मराठी भाषेच्या वापराबाबत कुसुमाग्रजांनी दिलेला विचार आजही तितकाच तंतोतंत लागू पडतो. ते म्हणत असत:

“परभाषेच्या कचेरीत आपली भाषा साहेबासारखी वागवा, पण आपल्या घरात ती आईसारखी जपली पाहिजे.”

साने गुरुजींनीही मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तिचे ऋण मान्य करण्याचा संदेश दिला होता. या विचारांतून मराठी ही केवळ व्यवहाराची नव्हे, तर ‘संस्कारांची’ भाषा आहे, हे स्पष्ट होते.

अलीकडेच केंद्र सरकारकडून मराठी भाषेला प्रदान करण्यात आलेला ‘अभिजात भाषा’ (Classical Language) हा दर्जा तिच्या दोन हजार वर्षांहून अधिक प्राचीन परंपरेचा आणि समृद्ध साहित्यसंपदेचा अधिकृत सन्मान आहे. या मान्यतेमुळे आता संशोधन, शोधनिबंध, विद्यापीठीय अभ्यासक्रम आणि प्राचीन हस्तलिखितांचे जतन व संवर्धन यांना मोठे बळ मिळणार आहे.

डिजिटल युगातील आव्हाने आणि आपली जबाबदारी

आजच्या एकविसाव्या शतकातील डिजिटल युगात मराठीसमोर नवी आव्हाने उभी आहेत. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), संगणकीय भाषा प्रक्रिया, ई-ग्रंथालये आणि सामाजिक माध्यमे (Social Media) या सर्व क्षेत्रांत मराठीची प्रभावी उपस्थिती वाढवणे ही काळाची गरज बनली आहे. प्रशासन, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योगव्यवहार आणि उच्च शिक्षण यांमध्ये मराठीचा सशक्त वापर होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहेच, पण तरुण पिढीत वाचनसंस्कृती, लेखनसंवेदना आणि भाषिक अभिमान रुजवणे ही आता आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

मराठी भाषा गौरव दिन हा केवळ एक औपचारिक उत्सव नसून तो आपल्या ‘सांस्कृतिक स्व-ओळखीचा’ उत्सव आहे. मराठी ही महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुख्य आधारस्तंभ आहे; तिच्या शब्दांत इतिहासाचा ठसा, संतवाङ्मयाची करुणा, स्वराज्याचा स्वाभिमान आणि आधुनिकतेची गगनभरारी सामावलेली आहे. “माझा मराठाचि बोलु कौतुकें” ही भावना केवळ उच्चारात न राहता ती आपल्या रोजच्या कृतीत उतरावी, मराठीचा वापर वाढावा आणि ती जागतिक पातळीवर अधिक अभिमानाने उभी राहावी, हीच या गौरव दिनानिमित्त सार्थ अपेक्षा!

— युवराज पाटील, (जिल्हा माहिती अधिकारी, पुणे)


Back to top button
Don`t copy text!