सातासमुद्रापार मराठीचा झेंडा फडकवणाऱ्या लेकीचा अन् इंग्रजीच्या प्राध्यापक बापाचा एकाच मंचावर ‘दुग्धशर्करा योग’! महात्मा एज्युकेशन सोसायटीत ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात


महात्मा एज्युकेशन सोसायटी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इंग्लंडस्थित सौ. अश्विनी वैद्य आणि इंग्रजीचे अभ्यासक प्रा. अनंत डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्थैर्य, फलटण, दि. १ मार्च : विद्यार्थी दशेत असताना केवळ पुस्तकी भाषेची मांडणी न करता, विविध स्पर्धांमधून केलेल्या लिखाणाचे सखोल आकलन करून ते दैनंदिन जीवनात आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंग्लंडस्थित ‘महाराष्ट्र मराठी मंडळा’च्या सदस्या सौ. अश्विनी वैद्य यांनी केले.

महात्मा एज्युकेशन सोसायटी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर इंग्रजीचे अभ्यासक प्रा. अनंत डोईफोडे, संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

इंग्लंडमध्येही जपली जातेय मराठी संस्कृती

सौ. अश्विनी वैद्य यांनी सातासमुद्रापार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, “जरी आम्ही इंग्लंडमध्ये स्थायिक झालो असलो, तरी मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी आम्ही सर्व मराठी कुटुंबे ‘महाराष्ट्र मराठी मंडळा’च्या माध्यमातून एकत्र येतो. या मंडळाद्वारे पुस्तक वाचन, कविता वाचन आणि कथा सादरीकरण यांसारखे विविध उपक्रम राबवून मराठीचे संवर्धन केले जाते.”

आपले दैनंदिन संवाद मराठीतच होणे गरजेचे असले, तरी आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. अवांतर वाचनाची सवय लावल्यास ज्ञानात भर पडेल, असे सांगत त्यांनी आपली ‘शब्द’ ही स्वरचित कविता सादर करून विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

‘माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच हवे’

कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख वक्ते प्रा. अनंत डोईफोडे यांनी मराठी भाषेच्या समृद्ध प्रवासावर प्रकाश टाकला. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या ओव्या व अभंगांमधून मराठीचा उगम आणि समृद्धी दिसून येते, असे ते म्हणाले. “संस्कृत ही जननी असून, त्यानंतरच्या प्राकृत भाषेवर संस्कार होऊन आधुनिक मराठीची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रातील विविध प्रांतांत मराठीच्या बोलीभाषा वेगवेगळ्या असल्या, तरी त्यांची गोडी एकच आहे,” असे प्रा. डोईफोडे यांनी स्पष्ट केले. माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवे, असा आग्रह धरत त्यांनी मराठी शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

व्यासपीठावर जुळून आला ‘दुग्धशर्करा योग’

संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या कार्यक्रमाचे एक अनोखे वैशिष्ट्य उलगडले. इंग्रजी भाषेचे ज्येष्ठ शिक्षक असलेले प्रा. अनंत डोईफोडे आणि सातासमुद्रापार इंग्लंडमध्ये मराठीच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या त्यांच्या कन्या सौ. अश्विनी वैद्य हे बाप-लेक एकाच व्यासपीठावर उपस्थित असणे, हा एक मोठा ‘दुग्धशर्करा योग’ असल्याचे त्यांनी सांगितले. “मराठी भाषा ही केवळ शासन स्तरावरील सोहळ्यांनी मोठी झाली नाही, तर ती जात्यावरच्या ओव्या, शेतातील भलरी गीते आणि तुकारामांच्या अभंगांनी खऱ्या अर्थाने समृद्ध झाली आहे. अशा छोट्या गावांमधून होणाऱ्या साहित्य संमेलनांमुळेच मराठी भाषेची व्याप्ती अधिक व्यापक होईल,” असा विश्वास प्राचार्य आवटे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक मनीष निंबाळकर व भिवा जगताप यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. तसेच, काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगतेही व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक किशोर पवार यांनी केले, तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (फलटण शाखा) कार्यवाह व लेखक अमर शेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!