मराठा आरक्षण : आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध, येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय जाहीर करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.१७: सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणास स्थगिती मिळाली आहे. या निर्णयानंतर राज्यभरातून संतापाची लाट उठली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अध्यादेश काढण्यासह वेगवेगळे पर्याय पुढे आले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांशी मराठा आरक्षणावर चर्चा केली. बैठकीनंतर बोलताना त्यांनी दोन ते तीन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.

उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना यावेळी म्हणाले की, ‘सुप्रीम कोर्टाने मोठ्या घटनापीठाकडे जाण्यासाठी परवानगी दिली. मात्र ती देताना अनपेक्षितपणे नोकरी आणि शिक्षणात कायद्याच्या अमलबजावणीला स्थगिती दिली आहे. दोन्ही सभागृहाच्या विरोधी नेत्यांशी आज यासंदर्भात चर्चा केली आहे. यापूर्वी याचिकाकर्त्यांशीही चर्चा झाली. आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या दिशेने आलो आहोत. विरोधी पक्षांशी चर्चा केल्यानंतर एका गोष्टीचे समाधान वाटले, ते म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा सरकार सोबत आहोत हे वचन दिले आहे.’

‘मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्व पक्षांनी एकमताने घेतला होता. आरक्षण देण्यासाठी सर्वजण वचनबद्ध आहोत. आजच्या बैठकीत पुढील न्यायालयीन लढाई कशी करायची आणि त्याचसोबत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा समजातील तरुण, तरुणींना काय दिलासा द्यायचा हादेखील प्रश्न होता. मराठा समाजाला सांगू इच्छितो की, आंदोलन करू नका, सरकार खंबीरपणे तुमच्यासोबत आहे. आम्ही सरकार म्हणून काही गोष्टी निश्चित केल्या आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांशी बोललो तेव्हा त्यांच्याकडून सूचना आल्या आहेत. या सगळ्या सूचना एकत्र करुन कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करुन सरकार पुढील पाऊल टाकेल आणि येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय जाहीर करू,’ अशी माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!