मराठा क्रांती मोर्चाकडून फलटणमध्ये शिवजयंती साजरी; बंडू अहिवळे यांच्या कार्याची दखल घेत केला सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २२ एप्रिल २०२३ | फलटण |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा क्रांती मोर्चाच्या फलटण येथील समन्वयकांनी त्यांना अभिवादन करून सर्व शिवप्रेमींना शिवजयंती तसेच अक्षय्यतृतीयाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच फलटण शहरातील सर्वच महापुरूषांच्या पुतळ्यांची मनोभावे स्वच्छता करीत असलेल्या बंडू अहिवळे यांना संपूर्ण पोशाख देत त्यांच्या कार्याची दखल घेतली. अहिवळे यांचे यावेळी सर्वांनी कौतुक केले.

फलटणमध्ये गेली अनेक वर्षे छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही अक्षय्यतृतीयेला साजरी केली जाते. दरम्यान, शिवजयंती साजरी करीत असताना मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य मार्गदर्शक ज्यांनी ‘एक शहर एक शिवजयंती’ संकल्पना मांडली व सत्यात उतरवली त्या स्व. नंदकुमार भोईटे यांना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करण्यात आले. छत्रपतींनी घालून दिलेल्या आदर्शानुसार मराठा समाजाने सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. यानुसार शहरातील सर्वच महापुरूषांच्या पुतळ्यांची स्वच्छता, रांगोळी व इतर देखभाल दुरूस्ती करणार्‍या व सर्वसमावेशक जाणिवेतून मनोभावे सेवा करणार्‍या बंडू अहिवळे यांना सन्मानपूर्वक बोलावून त्यांचा यथोचित सत्कार केला. त्यांच्या हातून अशीच कायम सर्वच महापुरूषांची सेवा घडो, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक तसेच सर्व ग्रामसेवक व पोलीस बांधव उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!