फलटण येथे 1000 मानवी साखळीद्वारे बनविला भारताचा नकाशा; 1000 टक्के मतदान करण्याचे केले आवाहन


दैनिक स्थैर्य | दि. १३ एप्रिल २०२४ | फलटण |
भारत निवडणूक आयोगामार्फत ‘स्वीप’अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे काम सुरू आहे. ४३ माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघामध्ये १३ एप्रिल रोजी सकाळी ७.०० वाजता श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण वाय.सी. हायस्कूल, एसटी स्टँड शेजारी, फलटण येथे मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०० मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा बनवून फलटण तालुक्यात १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सातारा जितेंद्र डुडी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हा अधिकारी सोलापूर मोनिका सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा याशनी नागराजन, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले व तहसीलदार फलटण डॉ. अभिजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृतीचे काम सुरू आहे.

यावेळी अप्पर तहसीलदार मयूर राऊत यांनी भारत निवडणूक आयोगामार्फत विविध उपक्रम राबवून मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती ‘स्वीप’ अंतर्गत सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून भारताच्या नकाशामध्ये फलटणमध्ये १०० टक्के मतदान करण्यासाठी मानवी साखळीद्वारे जनजागृती केल्याचे सांगून नवमतदार यांनी पुढे येऊन मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच प्रत्येक मतदार यांनी किमान १० मतदारांना मतदान करणेबाबत जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन करत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान जनजागृती उपक्रम ‘स्वीप’द्वारे करत असल्याचे यावेळी मयूर राऊत यांनी सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी नगर परिषद फलटण निखील मोरे, गटविकास अधिकारी फलटण चंद्रकांत बोडरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी चित्रकला, हॅन्ड वेल, पथनाट्य, झांजपथक, स्काऊट गाईड, एनसीसी गाईड अशा विविध कार्यक्रमांद्वारे मतदान जनजागृतीचे उपक्रम घेण्यात आले आहेत, असे सांगितले.

प्रास्ताविक ‘स्वीप’ सहायक अधिकारी सचिन जाधव यांनी केले. आभार लक्ष्मण अहिवळे तलाठी यांनी मानले.

कार्यक्रमास स्वीप नोडल ऑफिसर एस. के. कुंभार, धन्वंतरी साळुंखे व पथकप्रमुख शहाजी शिंदे, पूजा दुदुस्कर, स्वीप टीम तसेच मुख्याध्यापक, प्राचार्य सर्व विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षण विभागातील शिक्षक, विद्यार्थी तसेच नगरपालिकेतील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, लायन्स क्लब तसेच बीएलओ आणि सेवाभावी संस्था तसेच महिला बचतगट तसेच मतदार उपस्थित होते.

या कार्यक्रमात
‘चला तर मग या,
आपण पण सहभागी होऊ या’,
‘मतदार राजा जागा हो,
लोकशाहीचा धागा हो’
अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा तयार करण्यात आला होता.

मानवी साखळीचे आयोजन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ नियोजन कक्ष, फलटण यांच्या वतीने करण्यात आले होते.


Back to top button
Don`t copy text!