हिंदी भाषेच्या शिक्षणातून नोकरीच्या अनेक शाश्वत संधी उपलब्ध : डॉ. क्षितिज धुमाळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२२ । फलटण । एकविसाव्या शतकात हिंदी भाषेच्या शिक्षणातून नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. हिंदी विषय घेऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीच्या दृष्टीने प्रयत्न केले तर त्यांना नक्कीच चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. क्षितिज धुमाळ यांनी केले. मुधोजी महाविद्यालय फलटण, हिंदी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय योजना अंतर्गत आयोजित हिंदी अध्ययन मंडळ उद्घाटन व हिंदी दिन समारोहचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. क्षितिज धुमाळ उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनात ते पुढे असेही म्हणाले की, आज हिंदी भाषेचे विस्तारित प्रयोजनमूलक स्वरूप विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. आज हिंदी भाषेच्या ज्ञानातून विविध क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार आज कोणत्याही शाखेचा विद्यार्थी भाषा विषय घेऊन त्या भाषेचे ज्ञान प्राप्त करू शकतो‌. तसेच त्यामध्ये संशोधनही करू शकतो. विद्यार्थ्यांनी पारंपारिक नोकरीच्या मागे न लागता हिंदी अनुवादक, हिंदी अनुसंधान अधिकारी, राजभाषा अधिकारी, यासारख्या शासकीय नोकरीच्या संधींकडे आपल्या करिअरच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. परंतु त्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी असायला हवी. केंद्र शासनाच्या रेल्वे, परराष्ट्र, वित्त, संरक्षण, न्याय व विधी यासारख्या विभागांमध्ये हिंदी विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध आहेत. तसेच बँक, बीमा, सोशल मीडिया, बहुराष्ट्रीय कंपन्या, टेलिव्हिजन व फिल्म या क्षेत्रामध्ये देखील हिंदी विषय घेऊन शिक्षण घेतलेले विद्यार्थी चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या व रोजगार प्राप्त करू शकतात.

आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदी विभाग प्रमुख डॉ. नितीन धवडे यांनी हिंदी दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट करून आज हिंदी भाषेचे बदललेले रूप व त्यानुसार हिंदी भाषेच्या अभ्यासक्रमात केले जाणारे बदल यावर प्रकाश टाकला. ते पुढे असे म्हणाले की हिंदी भाषा ही आज फक्त साहित्याची भाषा राहिली नसून ती प्रयोजनमूलक व रोजगाराची भाषा बनली आहे. दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात हिंदी भाषेचा वापर व महत्त्व वाढत आहे. विद्यार्थ्यांनी देखील काळाची पाऊले ओळखून हिंदी व इंग्लिश या भाषांवर प्रभुत्व सिद्ध केले तर त्यांना भविष्यात करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील.

याप्रसंगी हिंदी दिनाचे औचित्य साधून हिंदी विभागामार्फत घेण्यात आलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत कु. सायली काळुखे, कु. स्नेहलता बिचुकले, श्री. धीरज गोडसे यांनी तर निबंध स्पर्धेत कु. शिवानी सरक, कु. गौरी कदम, कु. मनीषा गायकवाड या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले. स्पर्धांचे परीक्षक म्हणून प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर व प्रा. फिरोज शेख यांनी काम पाहिले. त्यांना देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सौ. सविता नाईक निंबाळकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. जितेंद्र बनसोडे यांनी करून दिला. मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार प्रा.संजय जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्र-संचालन प्रा. सौ. शिल्पा शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी कला शाखेतील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!