स्थैर्य, तळमावळे दि. २८: अनुवादक हे वेगाने विस्तारणारे करियर आहे ज्या विद्यार्थ्यांची भाषेवर प्रभुत्व आहे आणि ज्यांना करिअरच्या वेगळ्या वाटेवर जायचे असेल त्यांनी अनुवाद या क्षेत्राचा नक्कीच विचार करावा त्यात अर्थार्जन तर होईलच परंतु वेगवेगळ्या विभागांचा प्रदेशांचा देशांचा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असा अभ्यासही त्यातून करता येईल असे प्रतिपादन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात बोलताना केले
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण गाडे हे होते. याप्रसंगी लोकरंग मंच सातारा चे अध्यक्ष सुजित शेख उपस्थित होते
येथील काकासाहेब चव्हाण कॉलेजमध्ये कवी कुसुमाग्रज जयंती दिनी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी विभागाच्या वतीने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत “अनुवादक करिअरची नवी संधी ” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून जेष्ठ पत्रकार व लेखक विजय मांडके हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजय मांडके म्हणाले, जगातील अनेक देशांमधून मराठीचा भाषाभ्यास केला जात आहे. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानयुगात संपूर्ण जग इंटरनेटने जोडले आहे. अशावेळी आपणाला अधिक भाषा अवगत असणे ही काळाची गरज आहे. बदलत्या काळाबरोबर मराठीतून अनेक नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. या बदलाच्या प्रवाहात घरबसल्या अर्थार्जनाच्या अनेक गोष्टी निर्माण झाल्या आहेत. साहित्य, अनुवाद, भाषांतर, जाहिरातलेखन, चित्रपट, आकाशवाणी, विविध चॅनल्स, वर्तमानपत्रे, नियतकालिके अशा जीवनातील सर्वच क्षेत्रात अनुवादाची निकड निर्माण झाली आहे.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अरूण गाडे म्हणाले,’ आजही आपण मराठी भाषेत बोलताना लाजतो. उच्चभ्रूपणाच्या देखाव्यासाठी मुद्दाम हून इंग्रजी बोलण्याचा आव आणतो, मातृभाषेच्या समृद्धीसाठी हे योग्य नाही. तसेच विद्यार्थ्यांनी पारंपरिक करिअरचा विचार न करता काळाची पावले ओळखून करिअर निवड करावी. पदवी केवळ अर्थार्जनासाठी नव्हे तर चारित्र्यसंपन्न जीवन आचरण घडावे.
यावेळी ‘ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या कविता विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी लालबहादूर शास्त्री कॉलेज, सातारा माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मा. विजय मांडके यांचे शुभहस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण गाडे यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा.महेश चव्हाण यांनी केले. आभार प्रा. सचिन पुजारी यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. गवराम पोटे यांनी केले.
यावेळी गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते