दैनिक स्थैर्य | दि. ६ जून २०२३ | सातारा |
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा विकासाचा पाया रचला; परंतु आजच्या घडीला राज्यात विकासाची दृष्टी नसल्यामुळे राज्य पिछाडीवर पडले आहे. याउलट तेलंगणा ९ वर्षापूर्वी स्थापन झाले असूनही विकासात राज्याच्या पुढे गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भारतीय राष्ट्र किसान समितीच्या वतीने विकासाचा तेलंगाना फॉर्मुला वापरणार असून महाराष्ट्राच्या २८८ मतदार संघामध्ये पक्षाचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम आणि समन्वय समितीचे विजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाध्यक्ष संदीप साबळे, महिला आघाडीच्या वैजयंती कदम व शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व समितीचे जिल्हा संघटक शंकराव गोडसे यावेळी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, गेल्या अकरा वर्षात महाराष्ट्रामध्ये ६० हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीसाठी मोफत पाणी, शेतीमालाला भाव, दर्जेदार खते, पेरणीच्या वेळी शेती खर्चासाठी मदत, शेतमालाच्या खरेदीची राज्य सरकारकडून हमी, उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला योग्य भाव आणि शेतीची डिजिटल नोंदी या शेतकर्यांच्या मागण्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या गोष्टी होताना दिसत नाहीत. याउलट नऊ वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या तेलंगणा सारख्या राज्याने के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली जलऊर्जा, सौरऊर्जा, औष्णिक ऊर्जा या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. येथे २४ तास मोफत वीज, ७००० शेती खरेदीची केंद्रे यासाठी शासनाने ५ लाख कोटी रुपये खर्च केला आहे. मेंढपाळांना ७५ टक्के अनुदान देऊन मेंढ्या पुरवल्या जातात. वृद्धांना ३ हजार रुपये मदत, शेतकर्याला १० हजार रुपये अनुदान तेथे प्राप्त होते.
या तेलंगणा मॉडेलचा महाराष्ट्रात प्रसार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय किसान सक्रिय झाली असून महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमध्ये संपर्क संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत पक्षाकडे २ लाख ३० हजार सभासदांची नोंदणी झालेली आहे. सातारा जिल्ह्यातही पक्षाचे काम सुरू झाले असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये तेलंगणाच्या विकासाचे रोल मॉडेल घराघरात पोहोचवले जाणार आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने पक्ष उतरणार असून कोणाशीही युती केली जाणार नाही. शेतकर्यांचे प्रश्न आणि सर्वसामान्य मतदारांना बरोबर घेऊनच महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाचा बीआरएस समिती प्रयत्न करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.