
दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२२ । कोरेगाव । येथे रस्त्यावर बोलत उभ्या राहिलेल्या वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र भरदुपारी धूमस्टाईलने हिसकावणार्या दोघांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेे. याबाबत वैशाली विजय खटावकर (वय 65, रा. मनमित निवास, एमएसईबी कार्यालयाजवळ, एकंबे रोड, कोरेगाव) यांनी फिर्याद दिली.
याबाबत माहिती अशी, रविवारी दुपारी एकंबे रस्त्यावरील त्यांच्या निवास्थानासमोरील कच्च्या रस्त्यावर खटावकर या रुपाली गणेश गायकवाड यांच्यासोबत बोलत उभ्या होत्या. त्यावेळी स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी इसमांपैकी एकाने चालत जात खटावकर यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याच्या चेनमधील मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर दोघाही चोरट्यांनी तेथून पोबारा केला. तपास उपनिरीक्षक व्ही. ए. कदम करत आहेत.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					