‘उत्कृष्ट गणेशोत्सव’ स्पर्धेसाठी मंडळांना २ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑगस्ट २०२२ । मुंबई । राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्य शासनाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. अधिकाधिक मंडळांना स्पर्धेत सहभाग घेता यावा यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, [email protected] या ई-मेल वर 2 सप्टेंबर पर्यंत मंडळांना अर्ज करता येतील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

राज्यस्तरावरील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्यास रुपये 5 लाख, द्वितीय क्रमांकास रुपये दोन लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये एक लाख इतक्या रकमेची पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकांच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर what is new या शीर्षकावर निशुल्क अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेशोत्सव मंडळातील मूर्ती पर्यावरणपूरक असावी. सजावट पर्यावरणपूरक म्हणजेच यात थर्माकोल, प्लास्टीक आदी साहित्य असू नये. गणेश मंडळाचे वातावरण ध्वनी प्रदूषणरहित असावे. पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा, इत्यादी समाज प्रबोधन विषयावर देखावा / सजावट असावी. स्वातंत्र्य चळवळी संदर्भातील देखावा / सजावट याला अधिक गुण दिले जाणार आहेत. रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबिर, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत केलेल्या कार्याचे मूल्यमापन होईल. महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत मंडळाचे कार्य असावे. पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम / स्पर्धा, पारंपरिक / देशी खेळाच्या स्पर्धा याचबरोबर गणेशभक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा यात पाणी, प्रसाधनगृहे, वैद्यकीय प्रथमोपचार, परिसरातील स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन, आयोजनातील शिस्त या बाबी गुण देताना प्राधान्याने विचारात घेतल्या जाणार असल्याची माहितीही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!