स्थैर्य, फलटण दि.१९: चारी बाजूनी मृत्यूचे सावट दाटून आलेले असतानाही त्यातून एखादी व्यक्ती सहीसलामत बाहेर पडली तर ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अशीच काहीशी प्रचिती नुकतीच कांबळेश्वर, ता.फलटण ग्रामस्थांना आली.
फलटण पासून 7 किमी. असलेले निरा नदी काठी वसलेले कांबळेश्वर येथील तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र भिवाई देवी, मंदिर कांबळेश्वर ता.फलटण जि. सातारा या देवीला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात,तसेच कर्नाटक,आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यातील लोकांचे सुद्धा ही देवी श्रद्धास्थान आहे. सध्या अवकाळी पाऊस सगळीकडेच चालू असल्याने वीर धरणावर असलेली निरा नदीला कधी पाणी येईल सांगता येत नाही. असे चित्र असतानाच सांगोल्याचे एक शेंडगे नामक भाविक देवीच्या दर्शनासाठी आलेले. दर्शन घेऊन झाले. अंधार पडलेला, उशीर पण झालेला, त्यावेळी जास्त प्रमाणात नदीमध्ये पाणी पण नव्हते म्हणून रात्री मुक्काम मंदिरामध्येच करायचा आणि सकाळी निघायचं असे शेंडगे यांनी ठरवले. पण काळाच्या मनात काही वेगळेच होते. रात्री शेंडगे झोपलेले असताना त्यांना अचानक जाग आली, तर नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने मंदिरात सगळीकडे पाणीच पाणी त्यांना दिसले. अशी परिस्थिती असताना देखील शेंडगे हे भक्त निवास मंडपमध्ये पाण्यातून वाट काढत काढत आले. काय करावं समजत नव्हतं, एवढ्या मोठ्या पाण्यात निघण्याचा पर्याय पण नव्हता. घरी कोणाला फोन करावा तर फोन, कपड्याची बॅग सगळं पाण्यामध्ये वाहून गेलेलं. मग रात्रभर एकाच ठिकाणी अवघडून गेल्यामुळे शेंडगे यांनी भर नदीच्या पाण्यामध्ये उडी मारली व पलीकडे जाऊन बाहेर पडण्यासाठी ते मार्ग शोधू लागले. पण झाडांमुळे मार्ग काय उपलब्ध होत नव्हता, मग तेथील एक झाडाच्या फांदीला ते लटकून राहिले. सकाळी ग्रामस्थ मंडळी पूर पाहण्यासाठी गेली असताना, त्यांना पाण्यामध्ये कोण तरी अडकलेलं दिसले. ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस पाटील व प्रशासनास कळविले. त्यानंतर लगेचच फलटणचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार, सर्कल, तलाठी पोलीस पाटील सगळे घटनास्थळी दाखल झाले. तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन महाबळेश्वरच्या सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने शेंडगे यांना सुरक्षितरित्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
गावातील लोकांनी व प्रशासनाने मदत केल्याबद्दल शेंडगे यांनी सर्वांचे आभार मानले.