ममतादीदी गरजल्या; ‘स्वतःचं शीर धडावेगळं करून घेईन, पण भाजपपुढे झुकणार नाही’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य , नवी दिल्ली, दि .२५:  पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात घोषणाबाजी करण्यात आली होती. यामुळे नाराज झालेल्या ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता सोमवारी झालेल्या एका सभेत ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी भाजपसमोर झुकण्याऐवजी स्वत:चं शीर धडावेगळं करून घेईन.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटलं असतं तर मी सलाम केला असता. मात्र जर तुम्ही मला बंदुकीची नळी रोखून भीती घालण्याचा प्रयत्न करत असाल तर मला माहिती आहे कसं उत्तर द्यायचं. त्यावेळी प्रेक्षकांनी बंगालचा अपमान केला होता. त्यांनी पंतप्रधानांसमोर माझा अपमान केला. मी बंदुकीवर नाही तर राजकारणावर विश्वास ठेवते. भाजपने नेताजींचा आणि बंगालचा अपमान केला असंही ममता बॅनर्जींनी म्हटलं.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या भाषणादरम्यान जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. तेव्हा नाराज झालेल्या ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार देताना स्टेजवरूनच पंतप्रधान मोदींसह भाजपला सुनावलं होतं. हा कोणत्या पक्षाचा नव्हे तर सरकारचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात अशा प्रकारची घोषणा बाजी तुम्हाला शोभत नाही. एखाद्याला बोलावून त्याचा अपमान करून नये असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाषण थांबवलं होतं.

कोलकत्यामध्येच पदयात्रा काढत ममतांनी भाजपवर निशाणा साधला. आता निवडणुका जवळ आल्याने भाजपला नेताजी आठवत आहेत असा टोला त्यांनी लगावला. विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी आणि ममता व्यासपीठावर एकत्र आले होते पण उभय नेत्यांनी परस्परांशी बोलणे टाळले.


Back to top button
Don`t copy text!