स्थैर्य, कोलकाता, दि. १४: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यामुळे बंगालचे राजकारण चांगलेच तापले आहे. पण, ममता बॅनर्जींवर नंदीग्राममध्ये कोणताही हल्ला झाला नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव अलापन बंदोपाध्याय, स्पेशल पोलिस ऑब्जर्वर विवेक दुबे आणि अजय नायक यांच्या रिपोर्टच्या आधारावर ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे जखमी झाल्यानंतर ममता बॅनर्जींचा आज पहिलाच रोड शो होत आहे आणि यापूर्वीच ही रिपोर्ट समोर आली आहे.
याप्रकरणी दोन रिपोर्ट सादर
शनिवारी याप्रकरणी निवडणूक आयोगासमोर रिपोर्ट सादर करण्यात आली होती. पहिली रिपोर्ट सकाळी बंगालच्या मुख्य सचिवांनी दिली, ज्यात ममता बॅनर्जींना कारच्या दरवाजामुळे दुखाप झाल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर रात्री स्पेशल ऑब्जर्वर विवेक दुबे आणि अजय नायक यांनीदेखील आपली रिपोर्ट सादर केली. यात नंदीग्राममधील घटना एक अपघात असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या ताफ्यावर कोणत्या प्रकारचा हल्ला झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.