
श्रीमंत संजीवराजेंच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव; फलटणच्या कृषी महोत्सवात आधुनिक तंत्रज्ञान पाहण्यासाठी गर्दीचा ओघ वाढला.
स्थैर्य, फलटण, दि. २८ डिसेंबर : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय आयोजित ‘श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५’ ला अभूतपूर्व यश मिळत आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवसाअखेर तब्बल ४५,००० शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवाला भेट दिली आहे. दरम्यान, प्रदर्शनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान
शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करून उत्पादन वाढवणाऱ्या खालील शेतकऱ्यांना यावेळी श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले:
-
ऊस उत्पादक: श्री. अक्षय शिंदे
-
द्राक्ष उत्पादक: श्री. मधुकर सस्ते
-
आधुनिक दुग्ध व्यवसायिका: सौ. नीता नलवडे
-
डाळिंब उत्पादक: श्री. दत्तात्रय शिंदे
-
भाजीपाला उत्पादक: श्री. सागर नाळे
-
केळी उत्पादक: श्री. दीपक शिंदे आणि श्री. प्रकाश कदम
४५ हजार शेतकऱ्यांची उपस्थिती
कृषी प्रदर्शनाला फलटण व परिसरातील शेतकरी, युवक, महिला बचत गट आणि महिला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत सुमारे ४५,००० शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञान, विविध वाण आणि कृषी निविष्ठांची माहिती घेतली.
या सोहळ्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, महाविद्यालयीन समितीचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, कृषी विभागाचे अधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कर्मचारी, विद्यार्थी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उर्वरित कालावधीतही शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन अद्ययावत शेती तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

