दैनिक स्थैर्य । दि.२३ नोव्हेंबर २०२१ । फलटण । फलटण पंचायत समिती सदस्य व युवक ह्रदय सम्राट श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना पंचायत समितीच्या सभापती पदी विराजमान करावे ही मागणी तालुक्यातुन जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका व शहर यांनी देखील महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे मागणी केली आहे.
राजघराण्यात जन्माला आलेल्या प्रत्येकालाच सामाजिक परिवर्तनासाठी संघर्ष करावा लागला आहे. युवकांच्या ह्दयसिंहासनावर विराजमान असलेल्या विश्वजीतराजेंचे नेतृत्वही असेच आहे. फलटणच्या राजकारणातील एक सडेतोड स्पष्ट वक्ते व्यक्तीमत्व म्हणजे श्रीमंत विश्वजीतराजे आपल्या कामातील तत्परता, कर्तव्यदक्षता तेवढाच करारीपणा जनतेच्या समस्यांची जाण असणारा आणि त्या सोडविण्यासाठी प्रसंगी संघर्षाचे हत्यार उपसणारे एक दृष्टे नेतृत्व म्हणून विश्वजीतराजे यांच्या कडे आम्ही सर्व जण पाहतो, असेही पत्रकात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
राजे पणाचा डाम डौल न दाखवता सर्व सामान्यांच्या खांद्यावर हात टाकून मैत्री जपणार्या विश्वजीतराजेंकडे आकाशाला गवसणी घालण्याची प्रचंड क्षमता आहे. ग्रामीण भागातील तरूण वर्गाची कामे मार्गी लावण्यासाठी विश्वजीतराजेंनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. तसेच तालुक्यात पक्षवाढी साठी विविध सामाजिक उपक्रम, आंदोलने, मोर्चे यामध्ये विश्वजीतराजे नेहमी अग्रेसर असतात तसेच कोरोना काळात भीतीने कोणीही घराबाहेर पडत नव्हते तेव्हा विश्वजीतराजेंनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भयभीत झालेल्या जनतेसाठी कोविड तालुका दौरा पूर्ण करून आधार दिला कित्येकांना मदत देखील केली, असेही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
श्रीमंत विश्वजीतराजे यांना पंचायत समितीच्या सभापती पदी काम करण्याची संधी दिल्यास तालुक्यातील संपूर्ण विद्यार्थी, युवक वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहिल यात तिळमात्र शंका नाही. शिवाय तालुक्याला युवा सभापती मिळाल्यास युवकांचे प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे श्रीमंत विश्वजीतराजे यांना सभापतीपदी काम करण्याची संधी द्यावी, या आशयाची आग्रही मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे करण्यात आलेली आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर कदम, जिल्हा सरचिटणीस आदित्य भोईटे, तालुकाध्यक्ष अभिजित निंबाळकर, शहराध्यक्ष आकाश सोनवलकर, तालुका कार्याध्यक्ष आकाश यादव, तालुका उपाध्यक्ष निरंजन पिसाळ, निलेश जठार, तालुका सरचिटणीस प्रतिक पवार, तालुका संघटक प्रथमेश शेलार, प्रसाद जाधव, शहर उपाध्यक्ष गौरव नष्टे, प्रफुल्ल अहिवळे, शहर सरचिटणीस यश घाडगे उपस्थित होते.